मुंबई महापालिकेतले बोके कोण? उद्योग मंत्र्यांचा शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्यावर आरोप
प्रकल्प पळवण्याच्या आरोपावरून शिंदे गटाचे मंत्री भडकले, म्हणाले मुंबई महापालिकेतले बोके कोण?
मुंबईः मुंबई महापालिकेतील (Mumbai Municipal Corporation) 12 हजार कोटी रुपयांची कामं संशयाच्या घेऱ्यात सापडली आहेत. राज्य सरकारतर्फे या कामांची कॅग मार्फत चौकशी केली जाणार आहे. यावरून उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रातून जे जे प्रकल्प बाहेर जातायत, त्यावर आदित्य ठाकरे पत्रकार परिषद घेतात. मात्र मुंबईतल्या या मुद्द्यांवर कधी तरी प्रेस कॉन्फरन्स झाली पाहिजे.
आमच्यावर खोक्यांचे आरोप होत आहेत. मात्र मुंबई महानगरपालिकेत कोण कोण बोके आहेत, हे कुणीतरी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं पाहिजे, असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलंय.
पाहा उदय सामंत काय म्हणाले-
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे पत्रकार परिषद घेऊन खोटं बोलतात, असा आरोप उदय सामंत यांनी केलाय. आदित्य ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील आरोपांना उदय सामंत यांनी हे उत्तर दिलं.
वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासह आता टाटा एअरबसचा प्रकल्प आणि इतर दोन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले, ह एकनाथ शिंदे सरकारचं अपयश असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केला आहे. मात्र शिंदे सरकारच्या वतीने हे आरोप फेटाळून येत आहेत.
आधीच्या महाविकास आघाडी सरकारने हे प्रकल्प आणले म्हणतायत तर यासाठीची कोणती महत्त्वाची बैठक घेतली, कोणता एमओयू साइन केला, असा सवाल उदय सामंत यांनी केला.
अडीच वर्षांपासून शिवसेनेचे हे नेते कुणाशीच संवाद साधत नव्हते. मात्र एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतल्यानंतर हे नेते खोट्या का होईना पत्रकार परिषदा घेत आहेत, हे एका अर्थाने चांगले झाले आहे, असा टोला उदय सामंत यांनी लगावला.