नितीन गडकरी बेळगावात मराठी माणसाला पाडण्यासाठी भाजपचा प्रचार करणार का; संजय राऊतांचा सवाल
पंडित नेहरू यांनी काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देऊन चूक केली होती. ती चूक भाजपने दुरुस्त केली ना? मग आता पंतप्रधान मोदींनी बेळगावमध्ये येऊन ही चूकही दुरुस्त करावी | Sanjay Raut
बेळगाव: बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या प्रचारसभेनंतर आता मतदारसंघात शिवसेना विरुद्ध भाजप, असा सामना रंगण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी बुधवारी आपल्या प्रचारसभेत तुफान फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना तुम्ही बेळगावात मराठी माणसाला पाडण्यासाठी भाजपच्यावतीने सभा घेणार आहात का, असा सवाल विचारला. (Shivsena MP Sanjay Raut rally at Belgaum bypoll election 2021 Shubham Shelke)
मात्र, उद्या बेळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराला आले तरी शुभम शेळके यांचा भरधाव घोडा थांबणार नाही. आईची मुलापासून ताटातूट करण्यासाठी भाजप आणखी काय करणार? शुभमचा विजय हा संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना दिलेली भेट असेल. बेळगावची जनता साद घालेल तेव्हा महाराष्ट्र कायम पाठिशी उभा राहील, असे संजय राऊत यांनी म्हटले.
‘काश्मीरमधील कलम 370 हटवून नेहरूंनी केलेली चूक सुधारलीत ना, मग बेळगावची चूकही सुधारा’
या प्रचारसभेत संजय राऊत यांनी जम्मू-काश्मीर आणि बेळगावची तुलना करत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पंडित नेहरू यांनी काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देऊन चूक केली होती. ती चूक भाजपने दुरुस्त केली ना? मग आता पंतप्रधान मोदींनी बेळगावमध्ये येऊन ही चूकही दुरुस्त करावी, असे राऊत यांनी म्हटले.
तुम्ही दादागिरी केलीत आम्ही हिटलरचे बाप आहोत. उद्या महाराष्ट्राने मनात आणलं तर कर्नाटकची पाण्यावाचून तडफड होईल, पण आम्ही माणुसकी म्हणून पाणी बंद करत नाही, असेही संजय राऊत यांनी कर्नाटकला सुनावले.
सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक
भाजप खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. येत्या 17 एप्रिलला बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून 2 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
बेळगाव पोटनिवडणुकीसाठी रिंगणात कोण?
भाजपकडून सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी, तर कॉंग्रेसतर्फे आमदार सतीश जारकीहोळी रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेतर्फे के. पी. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र मराठी मतांची विभागणी टाळण्यासाठी त्यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर शिवसेनेने महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे बेळगाव पोटनिवडणुकीची लढत तिरंगी झाली आहे.
संबंधित बातम्या :
‘भगव्याला हात लावाल तर झेंडा खिशात ठेवून दांडा घालू’, संजय राऊतांचा कन्नडिगांना थेट इशारा
बेळगाव प्रशासनाला संजय राऊतांची धास्ती, स्टेज, साऊंड सिस्टिमची मोडतोड! राऊतांचा कडक शब्दात इशारा
(Shivsena MP Sanjay Raut rally at Belgaum bypoll election 2021 Shubham Shelke)