मुंबई : यंदा शिवतीर्थावर दसरा मेळावा (Dussehra Gathering) कुणाचा यावरुन गेल्या काही दिवसांपासून राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. अखरे मुंबई उच्च न्यायालयाचे (High Court) निर्णयामुळे हा तिढा सुटला असून शिवतीर्थावर आता शिवसेनेचाच (Shiv Sena) दसरा मेळावा होणार आहे. असे असले तरी महापालिकेने वेळोवेळी केलेल्या अडवणूकीमुळे दसरा मेळाव्याचा प्रश्न हा रखडत गेला. तर याकरिता पालिकेवर कुणाचा दबाव होता का याबाबत न बोललेलच बरं असं म्हणत अनिल परब यांनी पालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पालिकेने सुडबुद्धीने हे सर्व केले असले तरी यामागे राज्य सरकारचाच दबाव होता असाच सूर शिवसेनेतून निघत आहे.
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशा पद्धतीने शिवसेनेला हा दसरा मेळावा पार पाडावा लागणार आहे. शिवाय या अटीवरच ही परवानगी देण्यात आली आहे. याबाबत महापालिकेला कोर्टाकडून पत्रव्यवहार होईल आणि त्यापद्धतीने शिवसेनेला नियमावली दिली जाणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली असली तरी, काही नियम अटी देखील ठरवून देण्यात आल्या आहेत. यामध्ये दुपारी 12 ते 6 च्या दरम्यान मेळावा घ्यावा लागणार आहे. शिवाय अनुचित प्रकार घडू नये ही देखील पक्षाचीच जबाबदारी राहणार आहे.
शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून पक्षासाठी सर्वकाही प्रतिकूलच घडत होते. त्यामुळे दसरा मेळाव्याबाबत काय निर्णय होणार हे देखील महत्वाचे होते. आता शिवसेनेला परवानगी मिळाली असून यंदाचा मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात होणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले आहे.
1966 पासून शिवतीर्थावर शिवसेनचा दसरा मेळावा होत आहे. यंदा अनेकांनी यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, पण संकटानंतरही ही परंपरा कायम राहणार आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये हा मेळावा पार पडणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले आहे.