वेदांता गेला हे दुर्देवी, पण आगामी उद्योगांचं काय ? शिंदे सरकारमधील मंत्र्याचं उत्तर अन् विरोधकांना सल्लाही..!
वेदांता प्रकल्पावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र, सध्याचे राज्य सरकार हे गतिमान असल्याचे म्हणत त्यांनी टोलाही लगावला. पण शरद पवार यांनीच दोन मुख्यमंत्र्यांमधला फरक सांगितला हे एक बरे झाले, असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.
पुणे : (Vedanta Project) वेदांता प्रकल्प हा काही दोन महिन्यांमध्येच माघारी गेला असे नाही, तर (MVA) महाविकास आघाडी सरकारनेही सोई-सुविधा पुरवणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. महाविकास आघाडी हे पाप आता राज्य सरकारच्या माथी फोडण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्वकाही दोन महिन्यातच झाले असे नाही, यासाठी मोठी पार्श्वभूमी आहे असा दावा (Abdul Sattar) कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. असे असतानाही वेदांता प्रकल्प हा परराज्यात जाणे हे दुर्देवी आहे. यामुळे राज्यावर काही थेट परिणाम होणार नाही तर आगामी 6 महिन्यात वेगवेगळे प्रकल्प राज्यात नव्याने येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. राज्यात आणि केंद्रातही सत्ता असल्याने उद्योगमंत्री उदय सामंत हे वेगवेगळे प्रोजेक्ट राज्यात आणण्यासाठी प्रयत्न करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
ते एक बरं झालं..!
वेदांता प्रकल्पावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र, सध्याचे राज्य सरकार हे गतिमान असल्याचे म्हणत त्यांनी टोलाही लगावला. पण शरद पवार यांनीच दोन मुख्यमंत्र्यांमधला फरक सांगितला हे एक बरे झाले, असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे. शिवाय वेदांता प्रकल्प हा गुजरातला यामध्ये राज्य सरकारच दोषी असे नाही तर सुरवातीपासून नेमके काय झाले होते हे देखील पाहणे महत्वाचे असल्याचे ते म्हणाले आहेत.
भविष्यात उद्योग येतील पण आताचे काय..?
वेदांता प्रकल्प गेला तरी आगामी काळात अनेक उद्योग राज्यात आणू असे आश्वासन दिले जात आहे. पण हे केवळ एक गाजर असून हा प्रकल्प गेलाच कसा आणि तो परत आणण्यासाठी काय प्रयत्न केले जाणार असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. शिवाय याबाबत योग्य पाऊल उचलले गेले नाहीतर राज्यभर आंदोलन केले जाणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.