Chhagan Bhujbal : शिवसेनेच्या वकिलाने जैसे थे परिस्थिती ठेवण्यास कोर्टाला का सांगितलं?; भुजबळ म्हणतात कानुनी लोच्या झालाय
Chhagan Bhujbal : माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेनेवार टीका करणारं विधान केलं होतं. त्यावरही भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. रामदास कदम हे काहीतरी कारण काढत आहेत. भाजपने विश्वासघात केला म्हणून शिवसेना ही भाजप पासून वेगळी झाली आहे.
मुंबई: राज्यातील अपात्र आमदारांच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) सुनावणी करताना परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेनेच्या वकिलानेही कोर्टाकडे परिस्थिती जैसे थे ठेवण्याची मागणी केली होती. त्यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. जैसे थे परिस्थिती ठेवा असं शिवसेनेच्या वकिलाने का सांगितलं, हे काही कळलं नाही, असं सांगतानाच सगळा कानुनी लोच्या झाला आहे. देशाला मार्गदर्शक ठरेल असा निकाल कोर्टाला द्यावे लागेल, असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले. छगन भुजबळ मीडियाशी संवाद साधत होते. सर्व कानुनी लोच्या तयार झाला आहे. हे सगळं समजून घेण्यासाठी हरीश साळवे (harish salve) यांनी 8 दिवसाची मुदत मागितली होती. त्यावर कोर्टाने त्यांना लिखित उत्तर द्यायला सांगितलं. याप्रकरणासाठी कोर्ट मोठा बेंच किंवा घटनापीठ स्थापन करणार आहे की नाही हे लवकरच कळेल, असंही भुजबळ म्हणाले.
हे सर्व आमदार दुसऱ्या पक्षात गेले असते तर ते बंडखोर ठरले असते, असा युक्तिवाद शिंदे गटाच्या वकिलाने केला आहे. तर या आमदारांनी पक्षाचा व्हीप हा मोडला आहे, अस कपिल सिब्बल आणि मनू सिंघवी यांनी मांडल आहे. त्यामुळे कोर्ट आता या प्रकरणात काय निर्णय देतात ते पाहावं लागेल. कोर्टाचा निर्णय आल्यावरच भाष्य करता येईल. सध्या कोर्टात सुनावणी सुरू आहे. त्यावर अधिक बोलणं योग्य ठरणार नाही, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
रामदास कदमांचं म्हणणं पटत नाही
माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेनेवार टीका करणारं विधान केलं होतं. त्यावरही भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. रामदास कदम हे काहीतरी कारण काढत आहेत. भाजपने विश्वासघात केला म्हणून शिवसेना ही भाजप पासून वेगळी झाली आहे. त्यामुळे रामदास कदम हे जे काही बोलत आहे ते काही मला पटत नाही, असं ते म्हणाले.
त्यावर ठाकरेच बोलतील
यावेळी त्यांनी खासदार राहुल शेवाळे यांच्या दाव्यावर बोलण्यास नकार दिला. शेवाळे यांनी जो दावा केला आहे. त्यावर मला काहीच बोलता येणार नाही. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर केवळ उद्धव ठाकरेच देऊ शकतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.
1 ऑगस्टला सुनावणी
दरम्यान, आमदारांच्या अपात्रतेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. शिवसेनेच्या बाजूने कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडली. तर शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे आणि महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. तसेच राज्यपालांच्यावतीने तुषार मेहता यांनी बाजू मांडली. आता या प्रकरणावर येत्या 1 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे.