जळगाव : जळगाव महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पक्षातील फुटलेल्या 29 नगरसेवकांनी बैठक घेऊन भाजपचे गटनेते, उपगटनेते यांची हकालपट्टी केली आणि नवीन पदाधिकारी नियुक्त केले. जळगाव महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वीच भाजपच्या निम्म्या नगरसेवकांचा गट फुटून शिवसेनेत गेला होता. (Jalgaon BJP’s Rebellious 29 corporators form group)
फुटीर भाजप नगरसेवकांनी स्वतंत्र बैठक
जळगाव महापालिकेत काही महिन्यांपूर्वी भाजपच्या 29 नगरसेवकांनी फुटून शिवसेनेला पाठिंबा दिला, त्यामुळे शिवसेनेचा महापौर विराजमान झाला. महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता जाऊन शिवसेनेची सत्ता आली. यानंतर कालच्या दिवशी नाट्यमय कलाटणी मिळाली. फुटीर भाजप नगरसेवकांनी स्वतंत्र बैठक घेऊन महापालिकेत नवीन पदाधिकारी नियुक्त केले आहेत. याबाबत या गटाचे सभागृह नेते ललित कोल्हे यांनी महापौरांना लेखी पत्र देऊन नवीन पदाधिकारी नियुक्तीला मंजुरी देण्याची मागणी केली आहे.
काय आहे पत्र?
याबाबत दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, भाजपचे गटनेते असलेले भगत बालानी यांना बदलून त्यांच्या रिक्त जागेवर दिलीप बबनराव पोकळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर उपगट नेते राजेंद्र झिपरु पाटील यांच्या जागी चेतन गणेश सनकत यांची निवड करण्यात आली आहे. लोकशाही पद्धतीने ठराव करून या नियुक्त्या करण्यात आल्या असल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे. या बैठकीचे रितसर प्रोसेडिंग करण्यात आले असल्याचे ललित कोल्हे यांनी म्हटले आहे. प्रोसेडिंग बुकची प्रत त्यांनी दिली असून यात 29 नगरसेवकांच्या सह्या आहेत.
जळगावात भाजपच्या नाकावर टिच्चून शिवसेनेचा महापौर
याआधी, जळगाव महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत (Jalgaon Mayor election) शिवसेनेने भाजपच्या नाकावर टिच्चून विजय मिळवला होता. या निवडणुकीपूर्वी भाजपच्या 27 नगरसेवकांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे विजय संपादित केला. त्यामुळे महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांचा विजय झाला.
या निवडणुकीत बहुमतसाठी 38 मतांची गरज होती. जयश्री महाजन यांनी 45 मते मिळाली. तर भाजपच्या प्रतिभा कापसे यांना 28 मते मिळाली. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार कुलभूषण पाटील यांनी बाजी मारली. शिवसेनेचा हा विजय जळगावमधील गिरीश महाजन यांच्या वर्चस्वाला धक्का मानला गेला.
संबंधित बातम्या
माथेरानमधील 10 फुटीर नगरसेवकांचा राजकीय एन्काऊंटर, शिवसेनेचा भाजपला धक्का
जळगावात भाजपला हादरे सुरुच, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत तीन नगरसेवक शिवसेनेत
(Jalgaon BJP’s Rebellious 29 corporators form group)