जळगाव : राज्यासह फक्त देशातच नव्हे, तर जगभरात भाऊबीज उत्साहात सजारी केली जाते आहे. भाऊबिजेला (Bhaubij 2022) भाऊ बहिणीच्या घरी जातो. ओवाळणी होते. हे चित्र सगळीकडे पाहायला मिळतंय. पण गेल्या काही काळात महाराष्ट्रात (Maharashtra Politics) सुरु असलेल्या सत्तासंघर्षामुळे अनेक कुटुंब दोन गटात विभागली गेली. शिवसेना (Shiv sena Latest News) फुटल्यानंतर एकाच घरात दोन गट पडल्याचं दिसून आलं. ठाकरे गट आणि शिंदे गट अशी विभागणी झालेल्या घरांना दिवाळीने मात्र पुन्हा एकत्र आणलंय. निमित्त होतं भाऊबिजेचं. भाऊ-बहिणीच्या प्रेमाच्या नात्यापुढं राजकीय मतभेद गळून पडलेत.
जळगावमध्ये शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी ठाकरे गटात असलेल्या आपल्या बहिणीच्या घरी भाऊबीज सणानिमित्त भेट दिली. बहीण वैशाली सूर्यवंशी यांच्या घरी जाऊन आमदार किशोर पाटील यांनी भाऊबीज साजरी केली.
लाडका भाऊ भाऊबिजेला घरी आल्यानं वैशाली सूर्यवंशी यांनी देखील राजकीय मतभेद बाजूला ठेवले. त्यांनी लडक्या भाऊरायाचं मनोभावे औक्षण केलं. आणि दोघांनीही एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
वैशाली सूर्यवंशी यांनी म्हटलं की, आजच्या दिवशी आमच्या दोघांच्या मनात राजकारणाचा थोडासुद्धा विचार येत नाही. आमचे वैचारीक मतभेद असतीलही, पण आजच्या दिवसासाठी आम्ही ते बाजूला ठेवून एकत्र भाऊबीज साजरी करतो आहोत, असंही त्यांनी म्हटलं.
जेव्हा ठाकरे गटात असलेली बहीण शिंदे गटात असलेल्या आमदाराला ओवाळते! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षानंतरही ही भाऊबीज खास आहेच… #Jalgaon (VC : अनिल केऱ्हाळे )
वाचा सविस्तर : https://t.co/8KjL1SF2BC pic.twitter.com/yp2tG3QzSM— Siddhesh Sawant (@ssidsawant) October 26, 2022
आम्ही लहानपणा पासून दिवाळी आणि भाऊबीजेचा सण आनंदात साजरा करतो, असं किशोर पाटील यांनी म्हटलंय. आज आमच्या राजकीय वाटा जरी वेगळ्या असल्या, तरी भाऊ-बहीण म्हणून आमचे नातेसंबंध कायम आहेत, असं किशोर पाटील यांनी यावेळी म्हटलं.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली. त्यानंतर शिवसेनेतले 40 हून अधिक आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला. यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली होती. शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेना तर फुटलीच. पण महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने सत्तादेखील गमावली. त्यानंतर शिंदे यांनी भाजपच्या मदतीने पुन्हा राज्यात सरकार स्थापन केलं.
सध्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष हा सुप्रीम कोर्टात पोहोचलाय. सुप्रीम कोर्टात घटनापीठापुढे महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षाची सुनावणी सुरु आहे. या सुनावणीचा निकाल नेमका कुणाच्या बाजूने आणि कधी लागतो, याकडेही महाराष्ट्रासह संपूर्ण देशाची नजर लागली आहे.