Arjun Khotkar | अर्जुन खोतकर रडत रडतच म्हणाले, आजपासून मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं समर्थन करतोय
शिवसेना नेते यांनी अर्जुन खोतकर यांनी जालन्यात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देण्याचा निर्णय घोषित केला.
जालनाः शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी आज अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाण्याचा निर्णय घोषित केला. यावेळी ते प्रचंड भावूक झाले होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) परवानगीने, परिवारासाठी मी हा निर्णय घेतोय, हे सांगताना त्यांचे डोळे भरून आले होते. गेल्या आठ दिवसांपासून शिवसेना नेते अर्जुन खोतकर दिल्लीत होते. तोपर्यंत त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात जाण्याबाबत कोणतंही स्पष्ट वक्तव्य केलं नव्हतं. जालन्यात गेल्यावरच मी स्पष्ट भूमिका मांडेन, असं ते म्हणाले होते. जालन्यातील साखर कारखान्याविरोधात ईडीची जी कारवाई सुरु आहे, ती अडचण दूर होईल की नाही माहिती नाही. मात्र शेतकऱ्यांसाठी, हा कारखाना सुरु करण्यासाठी मदत करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी दिलंय. त्यामुळे आज मी त्यांना माझं समर्थन जाहीर करतो. माझ्या शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा देतोय, असं वक्तव्य अर्जुन खोतकर यांनी केलं.
शिंदेंना समर्थन देतेना काय म्हणाले खोतकर?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना समर्थन देण्यापूर्वी अर्जुन खोतकर यांनी त्यांची मुख्य अडचण काय आहे याबद्दल स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून मी दिल्लीत अनेक विषयांवर चर्चा केली. त्यानंतर आज जालन्यात येऊन निर्णय घोषित करतोय. आज संजय राऊत, विनोद घोषळकर, नेत्यांशी बोललो. मी सच्चा शिवसैनिक आहे. घरी आलं की परिवार दिसतो. त्यामुळे काही निर्णय करणं गरजेचे आहेत. मी पक्षप्रमुखांकडे परवानगी मागितली आणि यासंदर्भात ते बोलले. मी आज सर्वांच्या साक्षीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे. काही परिस्थितीनुसार हा निर्णय घ्यावा लागतोय…
पक्षप्रमुखांचे आभार..
जालन्यातील जनतेसमोर आपल्या भावना मोकळ्या करताना अर्जुन खोतकर म्हणाले, ‘ 1990 ला मी पहिल्यांदा शिवसेनेकडून पहिल्यांदा आमदार झालो. आजपर्यंत प्रामाणिकपणे पक्षाची सेवा करत आलो. मी एकटाच नाही तर सर्व सहकारी या सर्वांनी मिळून जिल्ह्यात शिवसेनेचं संघटन वाढवलं. सामान्य माणसापर्यंत आम्ही घेऊन गेलो. सामान्यांनीही तेवढाच विश्वास आमच्यावर टाकला. अनेक संस्था, विधानसभा, लोकसभा आमच्या पदरात लोकांनी यश टाकलं त्याबद्दल जालना जिल्ह्यातल्या मतदारांचं आभार व्यक्त करतो. पक्ष नेतृत्वाचेही आभार व्यक्त करतो. ती जबाबदारी मी समर्थपणे सांभाळू शकलो…
शिंदे गटात गेल्याने अडचणी दूर झाल्या?
एकनाथ शिंदे गटात गेल्याने तुमच्या मार्गातील अडचणी दूर झाल्या का, असा प्रश्न अर्जुन खोतकरांना विचारला असता ते म्हणाले, असे आताच नाही सांगता येत नाही. मात्र विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी काही आश्वासनं दिली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागेच्या प्रश्नावर मी रावसाहेब दानवेंशी बोललो आहे. यावेळी ते ही जागा सोडतील, अशी अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त इतर कोणतीही राजकीय डील झाली नसल्याचं खोतकरांनी स्पष्ट केलं.