Arjun Khotkar | मुख्यमंत्र्यांनी आता जालन्यात यावं, अर्जुन खोतकरांचं एकनाथ शिंदेंना आमंत्रण, मराठवाड्यात पुन्हा एक दौरा?
खोतकरांनी एकनाथ शिंदे गटात येण्यासाठी मनधरणीचे प्रयत्न करणारे अब्दुल सत्तारदेखील यावेळी उपस्थित होते. आता मुख्यमंत्री खोतकरांच्या मागण्या पूर्ण करणार का, याकडे जालन्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे
जालनाः जालन्याचे शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar)यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जालन्यात येण्याचं निमंत्रण दिलं आहे. जालन्यातील (Jalna) प्रलंबित विकास कामांना गती मिळण्यासाठी निधी मंजूर करावा, रामनगर येथील साखर कारखाना सुरु करण्यासाठी राज्य सरकारतर्फे मदत करावी, आदी विषयांवर अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जालन्यात येण्याचं निमंत्रण दिलंय. खोतकर आणि शिंदे भेटीच्या वेळी आमदार अब्दुल सत्तार, शंभुराजे देसाई, भरत गोगावले, प्रकाश अबिटकर माजीमंत्री सुरेश नवले हे सोबत होते. एकनाथ शिंदे यांचा नुकताच औरंगाबाद दौरा पार पडला. त्यानंतर खोतकरांचं आमंत्रण मुख्यमंत्र्यांनी स्वीकारून जालन्याला भेट दिल्यास मुख्यमंत्री झाल्यानंतरचा एकनाथ शिंदे यांचा हा दुसरा मराठवाडा दौरा ठरेल.
अर्जुन खोतकर-शिंदे भेट
शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा केल्यानंतर प्रथमच त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीचे छायाचित्र खोतकरांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. जालना जिल्ह्यातील प्रलंबित विकास कामांना गती मिळण्यासाठी निधी मंजूर करावा, रामनगर येथील साखर कारखाना सुरू करण्यासाठी राज्यशासनाने मदत करावी व विविध विषयांवर अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सोबत भेट घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जालना भेटीसाठी निमंत्रण दिल्याचंही त्यांनी सांगितलं.
जालना जिल्ह्यातील प्रलंबित विकास कामांना गती मिळण्यासाठी निधी मंजूर करावा, रामनगर येथील साखर कारखाना सुरू करण्यासाठी राज्यशासनाने मदत करावी व विविध विषयांवर अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सोबत चर्चा करून जालना भेटीसाठी निमंत्रण दिले.@mieknathshinde pic.twitter.com/GxyVy2NJfO
— Arjun Khotkar (@miarjunkhotkar) August 5, 2022
शिंदे गटाला समर्थन, आता अडचणी संपणार?
जालन्याचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील साखर कारखान्याच्या व्यवहारात अनियमितता आढळली होती. त्यामुळे खोतकरांचं कुटुंब अडचणीत सापडलं होतं. या पार्श्वभूमीवर अर्जुन खोतकर यांनी शिंदे गटाला समर्थन दिल्याचं सांगण्यात येत आहे. खुद्द अर्जुन खोतकर यांनीदेखील पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटाला समर्थन दिलं त्यावेळी अडचणीतला माणूस याशिवाय काय निर्णय घेऊ शकतो, असे म्हणत भावनाविवश होत उद्धव ठाकरे गटातून शिंदे गटात जात असल्याचं सांगितलं होतं. मात्र जालन्यातली प्रलंबित विकास कामं तसेच राम नगर येथील साखर कारखाना सुरु करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत करणार असल्याचं आश्वासन दिल्याचंही खोतकरांनी यावेळी सांगितलं होतं. याच कामांत मुख्यमंत्र्यांनी आणखी लक्ष घालावं, या मागणीसाठी खोतकरांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. खोतकरांनी एकनाथ शिंदे गटात येण्यासाठी मनधरणीचे प्रयत्न करणारे अब्दुल सत्तारदेखील यावेळी उपस्थित होते. आता मुख्यमंत्री खोतकरांच्या मागण्या पूर्ण करणार का, याकडे जालन्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे