Jamiat Ulema-e-Hind : धर्मसंसदेप्रमाणेच 1000 सद्भावना धर्मसंसद भरवणार जमियत, देवबंदच्या बुद्धिजिवी मेळाव्यात निर्णय
जमियत उलेमा-ए-हिंदच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले शायर नवाज देवबंदी यांनी आज तकशी बोलताना सांगितले की, लोकांमध्ये प्रेमाचा संदेश पोहोचवण्याची गरज आहे. मंदिर आणि मशिदीच्या नावावर लोकांना भांडण्याची गरज नाही, हा संदेश देण्याची आज गरज आहे. तर येणाऱ्या पिढीला प्रेमाचा संदेश देऊन पुढे जावे लागेल
देवबंद (उत्तर प्रदेश) : देशात सुरू असणाऱ्या मशीद-मंदिराच्या वादामुळे (Masjid-Mandir dispute) दोन गट समोरा समोर येत आहे. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होत आहेत. तर देशाच्या अनेक भागात मशीद-मंदिरच्या वादाला हवा देण्याचा प्रचत्न केला जात आहे. तर कर्नाटकात हिजाबनंतर मशीद-मंदिर वाद पुढे आला आहे. त्यातच आता तेलंगणात ही शिवलींगवरून राज्यातील सर्व मशिदी खोदू अशी वादग्रस्त विधान होत आहे. त्याचदरम्यान जमीयत उलेमा-ए-हिंद (Jamiat Ulema-e-Hind) यांनी आज उत्तर प्रदेशातील देवबंदमध्ये दोन दिवसीय सम्मेलन आयोजित केला आहे. ज्यात विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आज या परिषदेच्या पहिल्या दिवशी, इस्लामोफोबियावर (Islamophobia) चर्चा झाली. तसेच येथे मुस्लिम धार्मिक नेत्यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. तर देशाच्या समोर सकारात्मक संदेश देण्यासाठी जमीयत उलेमा-ए-हिंद यांनी धर्म संसदेच्या धर्तीवर 1000 ठिकाणी सद्भभावना संसदेचे आयोजन करण्याची घोषणा केली.
आमच्यात कमकुवतपणा नाही तर सामर्थ्य आहे
जमीयत उलेमा-ए-हिंदचे प्रमुख महमूद असद मदनी म्हणाले की, शांत राहण्यासाठी देशातील जनतेने मुस्लिमांकडून शिकले पाहिजे. आम्ही त्रास सहन करू परंतु देशाचे नाव खराब होऊ देणार नाही. तसेच ते म्हणाले की जर जमीयत उलेमाने शांतता वाढवण्याचा आणि वेदना सहन करण्याचा निर्णय घेतला असला तरी कोणी आमच्यात कमकुवतपणा आहे असे समजू नये हा कमकुवतपणा नाही तर सामर्थ्य आहे.
महमूद असद मदनी यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीबद्दल शायरीतून सुरूवात केली. आणि यावेळी ते भावनिकही झाले. ते म्हणाले की, आम्ही आमच्या स्वत: च्या देशात परके झालो आहोत. आम्हाला बाहेरचे म्हटलं जात आहे. त्याचवेळी मदनी यांनी अखंड भारताच्या विषयावर बोट ठेवले. ते म्हणाले की एकीकडे अखंड भारताबद्दल बोलले जात आहे. मात्र आज मुस्लिमांना चालणे देखील कठीण झाले आहे. मात्र ही वेळ संयम ठेवण्याचा आहे. आपल्या सयंमाच्या परिक्षेचा आहे.
इस्लामविरूद्ध भीती व द्वेष परवण्याची मोहीम
यापूर्वी इस्लामोफोबियासंदर्भात प्रस्तावही सादर करण्यात आला होता. या प्रस्तावात इस्लामोफोबिया आणि मुस्लिमांविरूद्ध चिथावणी देणाऱ्या घटनांचा उल्लेख आहे. या प्रस्तावात असे म्हटले आहे की, ‘इस्लामोफोबिया’ केवळ धर्माच्या नावाखाली वैर नाही, तर इस्लामविरूद्ध भीती व द्वेष परवण्याची मोहीम आहे. मानवाधिकार आणि लोकशाही मूल्यांविरूद्धातील हे एक पाऊल आहे. जो एक प्रयत्न आहे. यामुळे, आज देशाला धार्मिक, सामाजिक आणि राजकीय अतिरेकीपणाचा सामना करावा लागला आहे.
जमियतकडून असा आरोपही करण्यात आला आहे की, आता जितका देशात द्वेश पसरवला जात आहे तो तितका देशात कधी नव्हता. आज देशाची शक्ती अशा लोकांच्या हाती आली आहे ज्यांना शतकानुशतके देशातील जुन्या बंधुत्वाची ओळख बदलायची आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर (भाजपा) हल्ला करताना, जमीयत म्हणाले आहे की, आमच्या वारसा आणि सामाजिक मूल्यांना त्यांच्यासाठी काही महत्त्व नाही. त्यांना फक्त सत्ता हवी आहे. जमीयत उलेमा-ए-हिंद यांनी परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
हिंसाचाराला उत्तेजन
जमीयत उलेमा-ए-हिंदच्या संम्मेलनात धार्मिक नेत्यांनी सांगितले की, 2017 मध्ये प्रकाशित झालेल्या कायदा आयोगाच्या 267 व्या अहवालात हिंसाचाराला भडकवणाऱ्यांसाठी कायदा करण्याची शिफारस केली गेली. या कायद्यात शिक्षेची तरतूद असावी आणि सर्व कमकुवत लोकांसाठी. विशेषत: मुस्लिम अल्पसंख्यांकांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वेगळे करणाऱ्या प्रयत्नांवर बंदी घातली पाहिजे. मुस्लिम धार्मिक नेत्यांनी असे म्हटले आहे की, कायदा आयोगाच्या या शिफारसीवर त्वरित पावले उचलणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
इस्लामोफोबिया प्रतिबंधक दिवस 14 मार्च साजरा
जमीयतच्या या संम्मेलनात धार्मिक नेत्यांनी असेही म्हटले आहे की, मानवाच्या संवेदनांचा सन्मान व्हायला हवा. सर्व धर्म, जाती आणि समुदाय यांच्यात परस्पर सुसंवाद, सहिष्णुता आणि शांततापूर्ण सह-अस्तित्वाचा संदेश देण्यासाठी, संयुक्त राष्ट्रांनी प्रायोजित केलेल्या ‘इस्लामोफोबिया प्रतिबंधक’ आंतरराष्ट्रीय दिन दरवर्षी 14 मार्च रोजी साजरा केला पाहिजे. सर्व प्रकारच्या वंशविद्वेष आणि धार्मिक कारणास्तव भेदभाव निर्मूलन करण्यासाठी संकल्प व्हायला हवा.
जमीयत उलेमा-ए-हिंदचा स्वतंत्र विभाग
सध्याची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगून जमियत उलेमा-ए-हिंदने या परिस्थितीला तोंड देण्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही ‘जस्टिस अँड एम्पॉवरमेंट इनिशिएटिव्ह फॉर इंडियन मुस्लिम’ नावाचा विभाग तयार केल्याचे जमियत उलेमा-ए-हिंदने म्हटले आहे. अन्याय आणि अत्याचार रोखण्यासाठी, शांतता आणि न्याय राखण्यासाठी धोरणे विकसित करणे हा त्याचा उद्देश असेल.
सर्व स्तरांवर प्रयत्न
जमियत उलेमा-ए-हिंदच्या संम्मेलनात मुस्लिम धर्मगुरूंनीही केवळ विभाग निर्माण करून ही लढाई जिंकता येणार नाही, असेही म्हटले आहे. त्यासाठी प्रत्येक स्तरावर प्रयत्नांची गरज आहे. तत्पूर्वी मौलाना नियाज फारुकी म्हणाले की, जलशात ज्ञानवापी, मथुरा, कुतुबमिनार या सर्व मुद्द्यांसह मदरशांमध्ये आधुनिक शिक्षणाबाबत चर्चा होणार आहे. कोर्टात सुरू असलेल्या खटल्यांची जोरदार बाजू मांडली जाईल, असेही ते म्हणाले.
मंदिर-मशिदीच्या नावावर भांडण
जमियत उलेमा-ए-हिंदच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले शायर नवाज देवबंदी यांनी आज तकशी बोलताना सांगितले की, लोकांमध्ये प्रेमाचा संदेश पोहोचवण्याची गरज आहे. मंदिर आणि मशिदीच्या नावावर लोकांना भांडण्याची गरज नाही, हा संदेश देण्याची आज गरज आहे. तर येणाऱ्या पिढीला प्रेमाचा संदेश देऊन पुढे जावे लागेल, असेही ते म्हणाले. जमियतने देशात सद्भावना मंच निर्माण करण्याबाबत बोलले आहे. ते काव्यमय शैलीत म्हणाले- ‘जे वादळाने प्रेमाचे दिवे विझवतात, त्यांना जाऊन सांगा की आम्ही शेकोटी बनवतो. हे जग दोन काठ कधीच मिळू देत नाही, चला नदीवर पूल बांधूया.