भाजप सत्तेपासून फार काळ लांब राहू शकत नाही; भाजपाच्या ‘त्या’ टिकेवर जयंत पाटलांचे प्रत्युत्तर
शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीला राष्ट्रवादीच जबाबदार आहे, असा आरोप वारंवार भाजपाच्या वतीने करण्यात येत आहे. या आरोपाला जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेत (Shiv Sena) फूट पडून ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन गटाची निर्मिती झाली. आता तर निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण हे चिन्ह देखील गोठवण्यात आलं आहे. शिवसेनेमध्ये जी काही बंडखोरी झाली त्या बंडखोरीला राष्ट्रवादीच (NCP) जबाबदार असल्याचा आरोप भाजप (BJP) आणि शिंदे गटाच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे. राष्ट्रवादीनेच शिवसेना फोडल्याचा आरोप भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील केला आहे. भाजप आणि शिंदे गटाकडून सुरू असलेल्या या आरोपाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
नेमकं काय म्हटलं जयंत पाटील यांनी?
जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना भाजपावर जोरदार टीका केली आहे. भाजप सत्तेपासून फारकाळ लांब राहू शकत नाही. त्यामुळे मिळेल ती किंमत मोजून त्यांनी शिवसेना फोडली. मात्र राज्यातील जनता आता भाजपाच्या विरोधात गेली आहे. शिवसेनेतून ज्यांनी उठाव केला त्यांच्याबाबतील देखील जनतेच मत अनुकूल नाही. महाविकास आघाडीची निर्मीती करण्यासाठी पवार साहेबांनीच पुढाकार घेतला होता. त्यामुळे आम्ही शिवसेनेला विरोध करण्याचा प्रश्नच नव्हता उलट भाजपानेच शिवसेना फोडल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.
तिथे माझं स्वागतच झालं
पुढे बोलताना जयंत पाटील यांनी म्हटलं आहे की, शिवसेनेच्या सर्व आमदारांसोबत आमचे संबंध चांगले होते. मी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना जिथे, जिथे शिवसेनेचे आमदार होते तिथे माझं स्वागतच झालं. त्यामुळे शिवसेना आम्ही नाही तर भाजपाने फोडली असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.