Video : ‘षंढ कुठल्याच भूमिकेत नसतात, त्यामुळे जास्त बोलणार नाही’, सुजय विखेंच्या टीकेला जयंत पाटलांचं प्रत्युत्तर
सुजय विखे यांच्या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही सुजय विखे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय.
रत्नागिरी : सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. एकमेकांवरील टीका कधी वैयक्तिक पातळीवरही पोहोचल्याचं आपण पाहतोय. अशावेळी भाजप खासदार सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी रविवारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर जोरदार टोलेबाजी केली. सुजय विखे यांच्या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही सुजय विखे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय.
‘षंढांना काय बिरुदावली द्यायची’
सुजय विखे पाटील यांनी काल महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस नवऱ्याच्या, शिवसेना बायकोच्या तर काँग्रेस बिन बुलाये वऱ्हाडी असल्याची खोचक टीका केली होती. विखे यांच्या या टीकेबाबत आज जयंत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी काहीक्षण स्मितहास्य करत जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. ‘नवरा, बायको, पाहुणे अशी बिरुदावली आमच्यातील सगळ्यांना देत आहेत. पण षंढांना काय बिरुदावली द्यायची, षंढ कुठल्याच भूमिकेत नसतात. त्यामुळे मी त्यांच्यावर जास्त बोलणार नाही’, असा जोरदार टोला जयंत पाटील यांनी लगावलाय.
‘काँग्रेस बाप आहे, बापच राहणार’
सुजय विखे यांनी महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर केलेल्या टीकेबाबत पत्रकारांनी नाना पटोले यांनाही काल प्रश्न विचारला. त्यावेळी काँग्रेस बाप आहे आणि बापच राहणार. सुजय विखे पाटील याच्यावर जास्त बोलणे योग्य नाही. कारण तो अजून मुलगा आहे, असा टोला पटोले यांनी लगावला होता.
‘राष्ट्रवादी नवरा, शिवसेना बायको, तर काँग्रेस बिन बुलाये वऱ्हाडी’
‘महाविकास आघाडीचा संसार असा आहे की यात लग्न राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं आहे. राष्ट्रवादी हा नवऱ्याच्या भूमिकेत आहे. त्यांनी काही मनमानी करावी त्यांना कुणी काही बोलत नाही. शिवसेना ही मूक बायकोच्या भूमिकेत आहे. ती बिचारी खूप दु:खी आहे पण तिला बोलता येत नाही. तर काँग्रेस हे वराती आहे. त्यांना लग्नाची पत्रिका नव्हती पण ते बिन बुलाये लग्नाला गेलेत. त्यांना लाज नाही. त्यांना जेवायला कुणी बोलावलं नाही पण ते जेवणाचं ताट सोडेनात. त्यांना हाणलं, कुणी काही बोललं तर ते खाली बसून जेवायला तयार आहेत. पण जेवणाचं ताट काही सुटेना’, अशा शब्दात सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता.
इतर बातम्या :