फडणवीसांच्या काळात 65 हजार कोटींचे घोटाळे, ‘कॅग’ची दखल घेऊ : जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अर्थमंत्री जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या काळात 65 हजार कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे (Jayant Patil on Devendra Fadnavis Government).
नागपूर : देवेंद्र फडणवीस यांच्या काळात 65 हजार कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला आहे. कॅगने देखील यावर ताशेरे ओढले आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अर्थमंत्री जयंत पाटील यांनी या प्रकरणाची दखल घेणार असल्याचं सूचक वक्तव्य केलं आहे. (Jayant Patil on Devendra Fadnavis Government). आमचं सरकार चौकशी सरकार नाही, मात्र रेकॉर्डवर असलेल्या प्रकरणांची दखल घेऊ, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.
जयंत पाटील म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांच्या काळात 65 हजार कोटींचा गोंधळ असून आर्थिक घोटाळे झाले आहेत. या घोटाळ्यांवर कॅगने ताशेरे ओढले आहेत. आमचं चौकशी सरकार नाही, पण जे रेकॉर्डला आहे त्याची आम्ही दखल घेऊ. कॅगच्या मुद्द्यांची नोंद घ्यावी लागेल.”
महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कोणते निर्णय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यावर बोलताना जयंत पाटील यांनी शेवटच्या दिवशी विदर्भातील शेतकरी आणि महाराष्ट्रातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांबाबत चर्चा होईल, अशी माहिती दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. यावरुन फडणवीसांना अजित पवार निर्दोष आहेत हे माहित असल्याचाही दावा जयंत पाटील यांनी केला. भाजपने 5 वर्षे खोटे आरोप केले, ते एसीबीनेही सिद्ध केल्याचंही मत त्यांनी व्यक्त केलं.