राष्ट्रवादीचं ठरलंय, काँग्रेस-शिवसेनेशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेऊ : जयंत पाटील
राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची दिल्लीत तब्बल अडीच तास बैठक चालली. या बैठकीत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीबाबत चर्चा झाल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं (Jayant Patil Pandharpur By Poll NCP)
नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीबाबत (Pandharpur By Poll) आम्ही पक्ष म्हणून एक निर्णय घेतला आहे. शिवसेना आणि काँग्रेस या मित्रपक्षांशी चर्चा करु आणि अंतिम निर्णय जाहीर करु, अशी माहिती जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली. (Jayant Patil on Pandharpur Mangalwedha By Poll NCP Candidate)
भारत भालकेंचे पुत्र आणि पत्नीचे नाव चर्चेत
राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक तब्बल अडीच तास चालली. या बैठकीत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीबाबत चर्चा झाल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. त्यामुळे भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके किंवा पत्नी जयश्री भालके यांना तिकीट मिळणार, की वेगळ्याच उमेदवाराला उमेदवारी जाहीर होणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी 17 एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत आहे. भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र राष्ट्रवादीच्याच काही पदाधिकाऱ्यांनी भगीरथ भालके यांच्या उमेदवारीला विरोध केल्याने वाद निर्माण झाला.
अजित पवार-जयंत पाटील पंढरपुरात जाणार होते
खरं तर, वाद मिटवण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील रविवारी पंढरपुरात जाणार होते. मात्र मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यानंतर शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावण्यात आली.
‘गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नाही’
दरम्यान, पत्रकारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारला असता, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं. त्यामुळे परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस अनिल देशमुख यांच्या पाठीशी उभी असल्याचं पाहायला मिळत आहे. (Jayant Patil on Pandharpur Mangalwedha By Poll NCP Candidate)
‘ATS, NIA च्या चौकशीतून ठोस समोर येईल’
सध्या महाराष्ट्र एटीएस या प्रकरणाचा तपास करत आहे. एनआयएही तपास करत आहे. या चौकशीतून काहीतरी ठोस बाहेर येईल असा विश्वास आहे. जे गुन्हे झाले आहेत त्याबाबत खोलात जाऊन गुन्हे करणाऱ्याचा तपास सुरु आहे. तो तपास लवकरच पूर्ण होईल. गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. जो प्रमुख मुद्दा आहे, त्यावरुन लक्ष विचलित करण्याची गरज नाही. अंबानींच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणावरच फोकस राहील, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय.
संबंधित बातम्या :
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नाही – जयंत पाटील
भालकेंच्या जागी पोटनिवडणुकीत मुलगा की पत्नी? अजितदादा-जयंत पाटील पंढरपुरात फैसला करणार
(Jayant Patil on Pandharpur Mangalwedha By Poll NCP Candidate)