मुंबई : पार्थ पवारांना मंगळवेढ्यातून उमेदवारी देण्यावर अजून कुठलीही चर्चा नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय. भारत भालकेंच्या निधनानं मंगळवेढ्यात विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी आतापासूनच काही जणांचे नावं चर्चेत आहेत. त्यात आज (27 डिसेंबर) पहिल्यांदा अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांचं नाव चर्चेत आलंय. पार्थ पवारांनी मंगळवेढ्याची पोटनिवडणूक लढवावी अशी मागणीही राष्ट्रवादीच्या हितचिंतकांनी केलीय.
पार्थच्या उमेदवारीवर अजून तरी राष्ट्रवादीकडून प्रतिक्रिया देणारे जयंत पाटील हेच सर्वोच्च नेते आहेत. शरद पवार किंवा अजित पवार यांनीही याबाबत वक्तव्य केलेलं नाही. सोलापुरात एका स्थानिक वर्तमानपत्रात एक काल्पनिक राजकीय सदर छापून आल्यानंतर पार्थच्या उमेदवारीची चर्चा रंगलीय.
राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे 27 नोव्हेंबरला मध्यरात्री निधन झाल्यामुळे मंगळवेढा येथील विधानसभेची जागा रिक्त झाली. या जागेवर आता पोटनिवडणूक होणार आहे. याच जागेवारुन पवार घराण्यातील पार्थ पवार यांना तिकीट देण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.
माजी आमदार औदुंबर अण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी ही मागणी केली आहे. अमरजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना तसं पत्र लिहिलं आहे. पंढरपूर मतदारसंघात भावनेचं नाही तर विकासाचं राजकारण व्हायला हवं. पार्थ पवार पंढरपूरमध्ये आले तर रखडलेला विकास लवकर होईल, त्यामुळे पार्थ यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी अमरजित पाटील यांनी केलीय.
पार्थ पवार यांनी मावळ या मतदारससंघातून 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे विजयी झाले होते. आपल्या पहिल्याच निवडणुकीत पार्थ यांना पराभव पत्करावा लागला होता. यावेळी श्रीरंग बारणे यांना 7 लाख मतं मिळाली होती. तर पार्थ पावर यांना 4 लाख 97 हजारांच्या घरात मतं मिळाली होती. दरम्यान, त्यांच्या परभवाची अनेक कारणं असल्याचं राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात आलेलं आहे. मावळ मतदारसंघाची माहिती नसल्यामुळे तसेच, मतदारांवर छाप पाडू न शकल्यामुळे ते निवडणूक हारल्याचे सांगितले जात होते. त्यांनतर पार्थ यांना पुन्हा विधानसभेसाठी मंगळवेढा येथून तिकीट देण्याची मागणी त्यांच्या समर्थकांकडून केली जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पार्थ यांच्या उमेदवारीवर अजून कुठलीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरी, अमरजित पाटील आणि पार्थ समर्थक यांच्या मागणीवर राष्ट्रवादीचे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
संबंधित बातम्या :
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन
‘भालके नेहमी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी धडपड करायचे; महाराष्ट्राने एक चांगला नेता गमावला’