मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीतील धमाल विनोदी चित्रपटांच्या मालिकेत आजही अव्वल स्थानी असलेल्या ‘अशी ही बनवाबनवी’चे (Ashi hi Banvabanvi) विनोद आजही पाहायला आणि ऐकायला मिळतात. या सिनेमाला तब्बल 34 वर्षे झाली. पण हा सिनेमा आजही प्रत्येक प्रेक्षकाला पोट धरुन हसायला लावतो. हा माझा बायको पार्वती, लिंबाचं मटण, 70 रुपये वारले, सारखं सारखं एकाच झाडावर काय?, धनंजय माने इथेच राहतात का? अशा एका वाक्यातून विनोदनिर्मिती करणाऱ्या या चित्रपटाचे लाखो, करोडो चाहते आजही आपल्याला भेटत असतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटीलही (Jayant Patil) या चित्रपटाचे चाहते असल्याचं पाहायला मिळतंय. कारण, जयंतरावांनी इस्रायल दुतावासातील (Embassy of Israel) अधिकाऱ्याला ‘सुपर डुपर हिट’ असलेला ‘अशीही बनवाबनवी’ सिनेमा पाहण्याचा सल्ला दिलाय!
जगभरातील लोकांचं भारतीय सिनेसृष्टीवर असलेलं प्रेम काही नवं नाही. भारतीय सिनेसृष्टीवर प्रेम करणारा माणूस जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्याला नक्कीच सापडेल. अशाच भारतीय सिनेसृष्टीची भुरळ पडलेले इस्त्रायल दुतावासातील अधिकारी कोबी शोशानी यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. कामानिमित्त जयंत पाटील यांची भेट घेण्यासाठी आलेल्या कोबी शोशानी यांनी जयंत पाटलांना भारतीय सिनेमाबाबत असलेल्या प्रेमाबद्दल सांगताच जयंतराव पाटलांनी त्यांना काही चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला. शिवाय दिलखुलास स्वभाव असणार्या जयंतरावांनी यावर दाद दिली नाहीत तर ते जयंतराव कसले ! जयंतरावांनी कोबी यांना ‘अशीही बनवाबनवी’ हा मराठी सिनेमा पाहण्याचा सल्ला देतानाच या मराठी सिनेमात इस्त्रायलचा उल्लेख असल्याचंही नमूद केलंय.
Haha, I will surely make time to watch the movies you suggested. Your love for Bollywood films is indeed fascinating.
I recommend you to try Marathi films also. Sharing a clip from an iconic comedy – ‘Ashi Hi Banwa Banwi’. It has a reference of Israel as well. 🙂 https://t.co/s84LETVbXj pic.twitter.com/rP3I7FQlJr
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) March 29, 2022
अशी ही बनवाबनवी या चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, सिद्धार्थ, सुधीर जोशी, अश्विनी भावे, निवेदिता जोशी-सराफ, प्रिया बेर्डे, सुप्रिया पिळगावकर, विजू खोटे यांच्यासारख्या एकापेक्षा एक कलाकारांनी काम केलं आहे. या चित्रपटातील संवाद आजही लोकांना तोंडपाठ आहेत. सोशल मीडियावर आजही या सिनेमातील विदोनाचे मिम्स व्हायरल होत असतात. ‘तुमचे 70 रुपये वारले’ हा डायलॉग आणि इस्त्रायलचा किस्साही आजही चविने चर्चिला जातो.
मुंबई नोकरी आणि करिअरच्या शोधात आलेल्या गावाकडील 4 तरुणांची ही भन्नाट कथा आहे. मुंबईत रुम मिळवण्यासाठी तरुणांची होणारी हेळसांनी आणि त्यातून त्यांनी लढवलेली शक्कल प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीला उतरली होती. यात विश्वास सरपोतदार (सुधिर जोशी) यांच्या घरी धनंजय माने (अशोक सराफ) आणि त्याचा भाऊ शंतनु माने (सुशांत रे)भाड्याने राहत असतात. गावाकडून आलेल्या सुधीर (सचिन पिळगावकर) आणि परशुराम (लक्ष्मीकांत बेर्डे) अशोक सराफकडे येतात. पण घराच्या मालकाला हे मान्य नसतं. एक दिवस हे सर्वजण चहा पित असताना मालक अचानक येतो. तेव्हा या चौधांची त्रेधातिरपीट उडते. तेव्हा अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डेची ओळख करुन देत हा इस्त्रायलला जाणार असल्याचं सांगतो. मालकाच्या डायबेटीसची औषधं इस्त्रालयवरुन आणायची असतात आणि त्यासाठी 70 रुपये लागणार असल्याचं सांगितलं जातं. अशोक सराफ यांनी यापूर्वीच मालकाकडून हे कारण सांगून 50 रुपये घेतलेले असतात आणि आता 20 रुपये लागणार असल्याचं सांगून ते ही मालकाकडून उकळतात. चित्रपटातील नेमक्या याच किस्स्याचा दाखला देत जयंत पाटील यांनी इस्त्रायलच्या अधिकाऱ्याला अशी ही बनवाबनवी सिनेमा पाहण्याचा सल्ला दिलाय.
इतर बातम्या :