मोहन भागवत म्हणतात ब्राह्मणांनी पापक्षालन केलं पाहिजे; जयंत पाटील म्हणतात ही तर स्टॅटजी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर राष्ट्रावादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांंनी टीका आहे.
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या वक्तव्यावर राष्ट्रावादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांंनी टीका आहे. आपल्या पूर्वजांकडून राष्ट्रीय पाप झालं आहे, एका समाजावर अन्याय झाला आहे. त्यामुळे ब्राह्मणांनी पापक्षालन केलं पाहिजे असं भागवत यांनी म्हटलं होतं. मोहन भागवत यांच्या या वक्तव्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. निवडणुका आल्या की वेगवेगळ्या समाजाबद्दल बोललं जातं. समाजाबद्दल बोलून निवडणुकीचा हेतू साध्य केला जातो असं पाटील यांनी म्हटलं आहे.
जयंत पाटील यांनी नेमकं काय म्हटल?
जयंत पाटील यांनी मोहन भागवतांना त्यांच्या वक्तव्यावरून टोला लगावला आहे. निवडणुका आल्या की वेगवेगळ्या समाजाबद्दल बोललं जातं. समाजाबद्दल बोलून निवडणुकीचा हेतू साध्य केला जातो. निवडणुका जवळ आल्या की असे काही व्यक्तव्य करुन विशिष्ट वर्गाला चुचकारण्याचा प्रयत्न होतो. अशी काही लोकांची स्टॅटजी असते. या गोष्टी लक्षात घेतल्या तर मला वाटतं येत्या काळात मोहन भागवत साहेब विशिष्ट वर्गाला विश्वासात घेण्याच्या दृष्टीने काही पावलं भाजपाला सूचवतील आणि यातून ते आता जे काही भाषण करत आहेत त्याचे नक्कीच कृतीत रुपांतर होईल. असं पाटील यांनी म्हटलं आहे.
ब्राह्मण महासंघ आक्रमक
मोहन भागवत यांच्या या वक्तव्यावर ब्राह्मण महासंघ देखील आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पापक्षालन करण्याची गरज ब्राह्मणांना नव्हे तर मोहन भागवत यांना आहे असं दवे यांनी म्हटलं आहे.