माढात काय होणार? महादेव जानकर यांच्या उमेदवारीवर जयंत पाटील यांचं सर्वात मोठं विधान काय?
धैर्यशील मोहिते पाटील हे माढ्यातून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. परंतू पण भाजपाकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढ्यातून उमेदवारी दिल्याने धैर्यशील मोहिते पाटील नाराज झाले आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून रासपचे महादेव जानकर माढा लोकसभेचे उमेदवारी देण्याविषयी चर्चा सुरु आहे. त्यातच शेकापचे जयंत पाटील यांनी या जागेवरुन दुसऱ्या एका उमेदवाराला संधी द्यावी अशी मागणी केली आहे.
मुंबई | 18 मार्च 2024 : माढा लोकसभा जागेवरुन महाविकास आणि महायुतीमध्ये जबदस्त चुरस निर्माण झाली. भाजपाने माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिल्याने भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज झाले आहेत. दुसरीकडे रासपचे महादेव जानकर यांनी नुकतिचे माढा लोकसभेसाठी शरद पवार यांची परभणीत भेट घेतल्याची चर्चा आहे. यातच आता शेकापचे जयंत पाटील यांनी माढा उमेदवारी बद्दल आणखी एका व्यक्तीचे नाव घेत नवा पर्याय सुचविला असल्याने माढा निवडणूकीत रस्सीखेच सुरु झाली आहे.
माढा लोकसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत चुरस निर्माण झाली आहे. भाजपाने या ठिकाणी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी घोषीत केल्याने धैर्यशील मोहीते पाटील नाराज आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे देखील माढातून उभारण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतल्याचे म्हटले जाते. महाविकास आघाडीत शरद पवारांशी शिवाय आपले कोणाशी काही बोलणे झालेले नाही असे महादेव जानकर यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडी परभणीची जागा आपल्याला द्यायला तयार नाही आणि महायुतीचा माढाचा उमेदवार ठरला आहे. त्यामुळे माढा आणि परभणी अशा दोन्ही ठिकाणांवरुन आपण निवडणूक अर्ज भरणार असल्याचे महादेव जानकर यांनी म्हटले आहे.
जयंत पाटील यांची नवी मागणी
आगामी लोकसभेसाठी माढाची जागा इंडिया आघाडीतून आम्हाला द्या अशी मागणी आता शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांना माढातून उमेदवारी द्यावी असी मागणी पाटील यांनी केली आहे. डॉ. अनिकेत देशमुख यांनी 2019 ला विधानसभा निवडणूक लढवली होती. आता रासपचे महादेव जानकर यांची मनधरणी शेकापचे जयंत पाटील कसे करतात यावर सर्व ठरणार आहे. महादेव जानकर हे गणपतराव देशमुख यांच्या नातवाला विरोध करणार नाहीत जयंत पाटील यांनी म्हटले आहे. मात्र, महाविकास आघाडी जो उमेदवार निश्चित करेल त्याला आमचा पाठिंबा असेल शेकापचे आमदार जयंत पाटील यांची म्हटले आहे.