हरियाणातील पोटनिवडणुकीत रणदीप सुरजेवालांचा दारुण पराभव, भाजप विजयी
चंदीगड : हरियाणातील सत्ताधारी पक्ष भाजपने जिंद पोटनिवडणुकीत मोठा विजय मिळवलाय. तर काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवालांचा दारुण पराभव झालाय. सुरजेवालांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आहेत. भाजपचे कृष्ण लाल मिढ्ढा यांनी जननायक जनता पार्टी म्हणजेच जेजेपीच्या दिग्विजय सिंग चौटाला यांचा 12935 मतांनी पराभव केलाय. या निकालानंतर जेजेपीच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ केला. शिवाय ईव्हीएमवरही शंका घेतली. […]
चंदीगड : हरियाणातील सत्ताधारी पक्ष भाजपने जिंद पोटनिवडणुकीत मोठा विजय मिळवलाय. तर काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवालांचा दारुण पराभव झालाय. सुरजेवालांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आहेत. भाजपचे कृष्ण लाल मिढ्ढा यांनी जननायक जनता पार्टी म्हणजेच जेजेपीच्या दिग्विजय सिंग चौटाला यांचा 12935 मतांनी पराभव केलाय.
या निकालानंतर जेजेपीच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ केला. शिवाय ईव्हीएमवरही शंका घेतली. जेजेपीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि जमाव पांगवला. या पोटनिवडणुकीत भाजपचे बंडखोर राज कुमार सैनी यांच्या सुरु केलेल्या लोकतंत्र सुरक्षा पक्षानेही चांगली मतं मिळवली.
गेल्या दोन निवडणुकांमध्ये जिंदमधून विजय मिळवलेल्या इंडियन नॅशनल लोकदलचा उमेदवार थेट पाचव्या क्रमांकावर आहे. या पोटनिवडणुकीसाठी 28 जानेवारी रोजी मतदान झालं होतं. तब्बल 76 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दोन वेळा आमदार राहिलेले इंडियन नॅशनल लोकदलचे हरी चंद मिढ्ढा यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. मिढ्ढा यांचे चिरंजीव कृष्ण मिढ्ढा यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. इंडियन नॅशनल लोकदलमध्ये फूट पडल्यानंतर जेजेपीची स्थापना करण्यात आली.
रणदीप सुरजेवालांचा पराभव
राजधानी दिल्लीला लागून असलेल्या या पोटनिवडणुकीत काँग्रेसने प्रतिष्ठा पणाला लावली होती. शिवाय ही जागा जिंकल्यास हरियाणातील भाजपचं सरकार पाडण्याचं वक्तव्यही काँग्रेसच्या एका नेत्याने केलं होतं. पण काँग्रेसला थेट तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. रणदीप सुरजेवाला हे काँग्रेसचे हरियाणातील मोठे नेते मानले जातात. भाजप उमेदवाराने त्यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.
हरियाणा विधानसभेतील चित्र काय आहे?
महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेसाठी एकत्रच निवडणूक झाली होती. या निवडणुकीत भाजपने सत्ता मिळवली आणि मनोहर लाल खट्टर यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे दिली. 90 सदस्यसंख्या असलेल्या हरियाणा विधानसभेत भाजपने 47 जागांसह बहुमत मिळवलं. तर शिरोमणी अकाली दलही भाजपचा मित्र पक्ष होता, ज्याला एक जागा मिळाली होती. भाजपच्या आमदारांची संख्या जिंद पोटनिवडणुकीनंतर एकने वाढली आहे. 2009 ला जी विधानसभा निवडणूक झाली, त्यात भाजपला फक्त 4 जागा मिळाल्या होत्या. तर मोदी लाटेत 2014 ला काँग्रेसचा सुपडासाफ झाला होता.