‘शशिकांत वारिसे यांचा ‘पॉलिटिकल मर्डर’च’, जितेंद्र आव्हाडांचे सभागृहात आरोप, फडणवीसांचं उत्तर काय?
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर पत्रकार शशिकांत वारिसे यांनी रिफायनरीविरोधात बातम्या प्रकाशित केल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येतोय.
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारिसे यांचा मृत्यू हा पॉलिटिकल मर्डर असल्याचा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी आज विधानसभेत केला. विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. राजापूर रिफायनरीला विरोध करणाऱ्या पत्रकार शशिकांत वारिसे यांचा काही दिवसांपूर्वी अपघाती मृत्यू झाला. रिफायनरीला विरोध केल्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप विरोधकांचा आहे. हे प्रकरण पोलीस आणि गृहखात्यातर्फे दडपण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला. वारिसे यांच्या कुटुंबियांवर दबाव आणला जातोय, असा आरोप त्यांनी केलाय.
काय म्हणाले आव्हाड?
लोकशाही प्रक्रियेत सात ग्रामपंचायती रिफायनरी विरोधी समितीच्या निवडून आल्या. या प्रकरणातील कार्यकर्ता सत्यविजय चव्हाण यांच्याविरोधात मुंबई एटीएसने कारवाई केली. तिथेच ९-१० जणांना तडीपारीची नोटीस दिली आहे. वारिसे यांच्या प्रकरणात सरकारने जी एसआयटी नेमली आहे. त्या समितीतील अधिकाऱ्यांचीच या प्रकल्पात हजारो एकर जमीन आहे. जी गावं लोकशाही पद्धतीने रिफायनरी विरोधी समितीने निवडून आणली, त्या गावात पोलिसांनी लाँग मार्च काढण्याचं कारण काय? असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला.
फडणवीस यांचं उत्तर काय?
हे प्रकरण गंभीर असलं तरीही त्यात सनसनाटी कशी निर्माण करायची, याचं कौशल्य जितेंद्र आव्हाड असल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला. ही मोनोलेथिक साइट असेल तर ती संवर्धित केली जाईल, त्यासंदर्भात परवानग्या घेतल्या जाईल, इथे कुणी कुणी जमिनी घेतल्या त्याचीही माहिती घेतली जाईल, असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं.
या प्रकल्पातील जमिनी सरकारी अधिकाऱ्यांनी खरेदी केल्या असतील तर तो पैसा कुणी आणला, हे पहावं लागेल. सत्यविजय चव्हाण यांच्यावर गुन्हे दाखल असतील म्हणून त्यांच्यावर तडीपारीची नोटीस दिली असेल, यासंदर्भात माहिती घेतली जाईल. महाराष्ट्रात कुणीही विरोधात बोललं म्हणून त्याच्यावर कारवाई होणार नाही, असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
शशिकांत वारिसेंची हत्या कुणी केली?
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर पत्रकार शशिकांत वारिसे यांनी रिफायनरीविरोधात बातम्या प्रकाशित केल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येतोय. ६ फेब्रुवारी रोजी दुपारी एका दुचाकी वाहनावरून जात असताना पेट्रोल पंपासमोरील थार गाडीने त्यांना धडक दिली. या अपघातात शशिकांत वारिसे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कोल्हापूरला हलवण्यात आलं. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांचं निधन झालं. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पंढरीनाथ आंबेरकर यानेच त्यांना अपघातात ठार मारल्याचा आरोप केला जातोय. राजापूर रिफायनरी प्रकल्पात आंबेरकर याच्याही जमिनी असल्याचा आरोप केला जातोय. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येतेय.