भाऊ भावाला गोळ्या घालतो त्याला गृहकलह म्हणतात : जितेंद्र आव्हाड
राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad on Pawar Family Dispute) यांनी पवार कुटुंबात कौटुंबिक कलह होत असल्याच्या शक्यता फेटाळल्या आहेत.
मुंबई : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या आमदारकीच्या राजीनाम्यानंतर अनेक शक्यता वर्तवण्यात आल्या. त्यात पवार कुटुंबात कौटुंबिक कलह होत असल्याचाही अंदाज लावण्यात आला. मात्र, राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad on Pawar Family Dispute) यांनी या शक्यता फेटाळल्या आहेत. तसेच भाऊ भावाला गोळ्या घालतो त्याला गृहकलह (Pawar Family Dispute) म्हणतात, असा घणाघाती टोला भाजपला लगावला. आव्हाडांनी अप्रत्यक्षपणे भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन आणि त्यांचा भाऊ प्रविण महाजन यांच्या प्रकरणावर भाष्य करत भाजपला लक्ष्य केलं.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “आमचा घरसंसार एक आहे. कुणी उगाच हे गृहकलहामुळे झालं असं म्हणत ओरडत आहे. भाऊ भावाला गोळ्या घालतो, त्याला गृहकलह म्हणतात. बाकी गृहकलह नसतो. असं असलं तरीही आम्ही यातही कधी पडलो नाही.”
आव्हाड यांनी यातून थेट भाजपलाच लक्ष्य केलं. भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांना त्यांचा भाऊ प्रविण महाजन यांनी राहत्या घरात गोळ्या घातल्या होत्या. त्यात प्रमोद महाजन यांचा मृत्यू झाला होता. याचाच आधार घेत आव्हाडांनी एकप्रकारे भाजपला त्यांच्या गृहकलहाचीही चर्चा करु, असाच काहीसा इशारा दिल्याचं बोललं जात आहे.
यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार हे खूप भावनिक व्यक्ती असल्याचंही नमूद केलं. आव्हाड म्हणाले, “अजित पवार खूप भावनिक व्यक्ती आहेत. ते भावनिक असताना केवळ शरद पवारांचंच ऐकतात. ते आजही येणार नाहीत. कुठं तरी हिमालयात निघून जातील, असंच मला वाटलं होतं.”
‘दादोजी कोंडदेवांचा पुतळा काढल्याने एक विशिष्ट वर्ग अजित पवारांच्या मागे’
आज उभ्या महाराष्ट्राला अजित पवारांच्या भावना कळाल्या. माणूस असाच उद्विग्न होत नाही. त्यांनी किती हल्ले सहन करायचे? दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढल्यानंतर एक विशिष्ट वर्ग अजित पवारांसारख्या एका बहुजन समाजाच्या नेत्यामागे लागला. दर 3 महिन्याने त्यांच्यावर हल्ला होतो, असा आरोप आव्हाड यांनी केला.
आव्हाड म्हणाले, “अशा हल्ल्यांमुळे शेवटी त्यांचं कुटुंब अस्वस्थ होतं. हे माझ्यामुळे होतं अशी भावना तयार झाल्याने राजकारण सोडण्याचा विचार येतो. त्यातूनच त्यांनी हे निर्णय घेतला. बाकी यामागे इतर कोणतेही कारण नव्हतं हे आज स्पष्ट झालं. महाराष्ट्रात आज अजित पवार आणि त्यांचं ह्रदय याचीच चर्चा होईल. याचा मला मनापासून आनंद आहे.”
ते म्हणाले, “आम्ही देखील आक्रमक असतो. मात्र, व्यक्तिगत आक्रमक नसतो. आम्ही एका विचारधारेच्या विरोधात लढत असतो. त्यांनी दादाजी कोंडदेव यांचा पुतळा काढला तो एका विशिष्ट विचारधारेतून काढला.”
‘हे व्यक्तीद्वेषातून सुडनाट्याचं राजकारण’
जितेंद्र आव्हड म्हणाले, “बँकेत 11 ते 12 हजाराच्या ठेवी असताना 25 हजार कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करतात. कोठून आले 25 हजार कोटी? आज हीच बँक 225 कोटी रुपयांच्या नफ्यात आहे. हा केवळ व्यक्तीद्वेषातून सुडनाट्याचं राजकारण करत बदनामी करण्याचा प्रयत्न आहे. अजित पवार हा बहुजनांचा मुख्यमंत्री होऊ शकेल या ताकदीचा नेता असल्याने त्यांना लक्ष्य करण्यात आलं.”
‘शरद पवार सोलापूरमध्ये जे बोलले त्यानंतर हे सुडनाट्य पेटवण्यात आलं’
आरोपपत्रात शरद पवारांचं नावंच नव्हतं. तरिही ईडीच्या आरोपपत्रात शरद पवारांचं नाव येतं. त्यासाठी उच्च न्यायालयाचं नाव घेतलं जातं. डीओडब्ल्युने सरकारच्या वतीने न्यायालयात अशी कोणतीही केसच होत नाही असं सांगितलं आहे. शरद पवार सोलापूरमध्ये जे काही बोलले त्याच्यानंतर हे सुडनाट्य पेटवण्यात आलं, असाही आरोप आव्हाड यांनी केला.