ठाणेः मुंब्रा (Mumbra) येथे मुस्लिम महिलेला पुढे करून मला बरबाद करण्याचा डाव रचला. यावेळी मुख्यमंत्र्यांची अस्वस्थता मला दिसत होती, अशी संतप्त प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला. राजकीय सूडापोटी ही कारवाई सुरु आहे. सत्ता आहे, त्यामुळेच हा प्रकार घडतोय, असंही आव्हाड म्हणाले.
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात रीदा राशिद या भाजप महिला पदाधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वी विनयभंगाची तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी आव्हाड यांच्याविरोधात 354 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला. यावरून आव्हाड यांनी ही प्रतिक्रिया दिली.
सामान्यपणे न लागणारे कलम जेव्हा माझ्यावर लावले, तेव्हाच स्पष्ट झालं होतं. पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर काम करतो, त्याला कायद्याचं पूर्ण त्रान असतं. जो गुन्हा बसत नाही, तोही लावायला कचरतात…
माझ्यावर लावलेला 354 हा गुन्हा कधीही लागू शकत नाही, हे पोलिसांना माहिती होतं. मुस्लिम महिलांना पुढे करून माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न यांनी केला, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.
माझ्यावर एफआयआर दाखल करताना एक मिनिटाचाही वेळ घेतला नाही. तर ज्या महिलेने आरोप केले, तिच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी चार दिवस घेतले. अखेर आंदोलन झाल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.
शिंदे भाजप सरकारने नगरपालिका-महानगरपालिका निवडणुकांसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने केलेली प्रभाग रचना रद्द करण्यात येईल. यावरून जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली.
ते म्हणाले ,’ मागच्या प्रभाग योजनेच्या वेळी आजचे मुख्यमंत्री हे तेव्हाचे नगर विकास मंत्री होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया झाली होती. परंतु पुन्हा जर प्रभाग रचना होत असेल तर महाराष्ट्राचे 1500 कोटी पाण्यात गेल. ही प्रभाग रचना जर चुकीचे असेल तर तेव्हा या प्रभाग रचनेला मान्यता का दिली? तेव्हा तर कोणाचा कोणावरती दबाव नव्हता..
इलेक्शन कमिशन सुद्धा पिंजऱ्यातला पोपट झाला आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.