राज ठाकरे यांनी ती स्क्रीप्ट वाचली नव्हती का? जितेंद्र आव्हाड यांचा सवाल, भर सभेत स्क्रिप्ट दाखवली…
औरंगजेब संभाजी राजेंच्या अंगावर आला, याचं कारणच ते होतं. आपल्या मुलाने बंड केलं आणि त्याला सहाय्य संभाजी महाराज करतायत, हे औरंगजेबाला सहन होत नव्हतं, त्यामुळेच त्यांनी संभाजी महाराजांची हत्या केली, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं.
अभिजित पोते, पुणेः राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर सडकून टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारीत हर हर महादेव चित्रपटावरून राज ठाकरेंना खडा सवाल केला. राज ठाकरे यांनी या चित्रपटात आवाज देण्यापूर्वी त्याची स्क्रिप्ट वाचली नव्हती का, असा थेट सवाल त्यांनी केलाय. पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. भाषणादरम्यान, त्यांनी हातातील स्क्रिप्ट दाखवली. चित्रपटात दाखवण्यात आलेल्या बाजीप्रभू देशपांडे आणि शिवाजी महाराज यांच्यातील संबंधांवर जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला आहे. याधीही त्यांनी आपली भूमिका सविस्तर मांडली आहे.
संभाजीराजे स्वराज्यरक्षकच होते..
अजित पवार यांनी संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हटलं आहे. ते योग्यच आहे. ते स्वराज्य रक्षक नसते तर त्यांनी अकबराला सहा वर्ष आपल्याजवळ ठेवला नसता.
औरंगजेब संभाजी राजेंच्या अंगावर का आला?
औरंगजेब संभाजी राजेंच्या अंगावर आला, याचं कारणच ते होतं. आपल्या मुलाने बंड केलं आणि त्याला सहाय्य संभाजी महाराज करतायत, हे औरंगजेबाला सहन होत नव्हतं, त्यामुळेच त्यांनी संभाजी महाराजांची हत्या केली, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं.
राहुल गांधी यांचं कौतुक
जितेंद्र आव्हाड यांनी या कार्यक्रमात राहुल गांधी यांचं कौतुक केलं. सोशल मीडियामुळे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा घराघरात पोहोचली. राहुल गांधी यांच्याकडे पाहिलं की असं वाटतं गांधी कभी मरते नहीं…. देश चालवायला एक नेता लागतो.. तो नेता राहुल गांधी यांच्यात आहे, असं वक्तव्य आव्हाड यांनी केलं.
त्या दिवशी देशाचा पाकिस्तान होईल…
अथर्वशीर्ष पठण करण्यासाठी पुण्यात विक्रम होत असेल तर पुणेकरांचं अभिनंदन. मात्र विद्यापीठाच्या बाहेर धर्म ठेवावा. ज्या दिवशी विद्यापीठात धर्म जातो, त्या देशाचा पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका होतो… ही उदाहरणं आहेत. पण अजूनही आपण शिकणार नसू तर ते दुर्दैव आहे, अशी खंत जितेंद्र आव्हाड यांनी बोलून दाखवली.