मुंबई : पाठीच्या मणक्यावरील शस्त्रक्रियेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session) पहिल्या दिवशी उपस्थित राहू शकले नाहीत. काल सत्ताधाऱ्यांकडून आयोजित चहापानाच्या कार्यक्रमालाही मुख्यमंत्री उपस्थित नव्हते. त्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या भाजपमधील नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर सवाल उपस्थित केले जात आहे. त्याचबरोबर जोरदार टीकाही सुरु आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आपला बाप आजारी असताना आपण चर्चा करतो का? असा सवाल आव्हाडांनी केलाय.
कुणाच्या तरी आजारपणावर टीका करणे ही प्रगल्भता नाही. जेव्हा गरज लागेल तेव्हा मुख्यमंत्री विधानभवनात येतील. आपला बाप आजारी असताना आपण चर्चा करतो का? ती आपली संस्कृती नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्याचबरोबर कुणी वैयक्तिक टीका करत असेल तर मी बोलणार नाही, असंही आव्हाडांनी आवर्जुन सांगितलं.
ओबीसी आरक्षणावर बोलताना, शरद पवार यांनी लागू केलेले आरक्षण आता रद्द होण्याची वेळ आलीय. केंद्राने सांगितले इम्पेरिकल डेटा बरोबर आहे. पण नंतर सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर हा डेटा बरोबर नाही असं म्हणाले. महाराष्ट्राला एक न्याय आणि मध्य प्रदेशला एक न्याय. पण असो… देर आये दुरुस्त आये, असंही आव्हाड म्हणाले.
भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. जनता खडबडीत रस्त्यांवर, जनता खड्ड्यांमधून मार्ग काढते. तर दुसरीकडे मात्र राजाचे रस्ते हे गुळगुळीत आहेत. आम्ही जेव्हा रस्त्यांच्या विकासासाठी पैसे मागतो, तेव्हा निधी शिल्लक नसल्याचे आम्हाला सांगितले जाते. मात्र दुसरीकडे विधानसभा मार्गावरील रस्ते गुळगुळीत बनवले जातात, हे राज्याचे दुर्दैव आहे. राज्यातील सर्व सुविधा एकाच कुटुंबासाठी का? असा सवाल नितेश राणेंनी केलाय.
‘आपल्या राज्याला मुख्यमंत्रीच राहिलेला नाही. राज्याचे अधिवेशन सुरू आहे, मात्र मुख्यमंत्री कुठेही दिसत नाहीत. त्यामुळे राज्य नेमके कोण चालवतो असा प्रश्न पडतो. राज्याचा चार्ज सध्या कोणाकडे दिला आहे, याचीही काही माहिती नाही. रश्मी ठाकरे या मुख्यमंत्री होणार आहे, अशी चर्चा आहे, निदान ते तरी जाहीर करा’, असा टोलाही नितेश राणेंनी लगावलाय.
इतर बातम्या :