जेएनयूला मोदींचं नाव द्या, भाजप खासदार हंसराज हंस यांची मागणी
जवाहरलाल नेहरु दिल्ली विद्यापीठाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव द्या, अशी मागणी भाजप खासदार आणि पार्श्वगायक हंसराज हंस यांनी केली आहे.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार हंसराज हंस (Hansraj Hans) यांनी ‘जेएनयू’ (JNU) ला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं नाव देण्याची मागणी केली आहे. ‘मोदीजींच्या नावावर काहीतरी असायला हवं’ असं वक्तव्य हंस यांनी जवाहरलाल नेहरु दिल्ली विद्यापीठ अर्थात जेएनयूमध्ये आयोजित एका कार्यक्रमात केलं.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्याबद्दल हंसराज हंस बोलत होते. ‘काश्मीर आता जन्नत होणार आहे. सर्व शांततेत राहतील, अशी प्रार्थना करुयात. आपल्या पूर्वजांनी चुका केल्या, आणि आपण भोगत आहोत. मी तर म्हणतो जेएनयूचं नाव एमएनयू (MNU) करा, मोदीजींच्या नावावर काही असायला हवं ना’ असं हंसराज म्हणाले.
हंसराज हंस यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यावरही टिपण्णी करण्याची संधी सोडली नाही. ‘जेएनयू’मधील ‘जे’ चा अर्थ काय होतो? असा प्रश्न हंसराज यांनी विचारला. त्यावर ‘जवाहरलाल नेहरु’ असं उत्तर कोणीतरी दिलं असता ‘त्यांच्यामुळे काहीतरी झालं ना’ असा टोला हंसराज यांनी लगावला.
#WATCH Delhi: BJP’s Hans Raj Hans speaks in JNU on Article 370 abrogation. Says “Dua karo sab aman se rahein, bomb na chale…Hamare buzurgon ne galatiyan ki hain hum bhugat rahe hain…Main kehta hoon iska naam MNU kar do, Modi ji ke naam pe bhi to kuch hona chahiye…” (17.08) pic.twitter.com/gejRVIXhZa
— ANI (@ANI) August 18, 2019
‘भारत किंवा पाकिस्तान कोणत्याही देशाचा सैनिक मारला गेला, तरी एक आई आपला मुलगा गमावते. तुम्ही परम वीर चक्र किंवा धरम वीर चक्र द्या, आईला तिचा सुपुत्र परत मिळत नाही’ असं हंसराज हंस म्हणाले.
हंसराज हंस यांनी 2016 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. यापूर्वी ते शिरोमणी अकाली दल आणि काँग्रेसमध्येही होते. हंसराज हंस यांनी बॉलिवूडमध्ये अनेक गाणी गायली आहेत. कच्चे धागे, बिच्छू, नायक, सोनू के टिटू की स्विटी यासारख्या चित्रपटांसाठी त्यांनी गायलेली गाणी गाजली आहेत.