शिवसेना-राष्ट्रवादीकडून मित्रपक्षांचा सन्मान, काँग्रेसने वचन का नाही पाळलं? घटकपक्षाची खंत
सत्तेत असूनही आम्हाला वाटा मिळाला नाही, अशी खंत पीआरपीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केली
जळगाव : “पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सत्तेत असूनही नेत्यांना कोणतंही मंत्रिपद देण्यात आलं नाही, याचा आम्हाला राग नाही, मात्र खंत आहे” अशा शब्दात पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक आणि माजी खासदार जोगेंद्र कवाडे (Jogendra Kawade) यांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेना-राष्ट्रवादीने मित्रपक्षांचा सन्मान केला, तसा आम्हाला सत्तेत वाटा का नाही? असा सवाल जोगेंद्र कवाडेंनी काँग्रेसला विचारला. राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये पीआरपी सहभागी आहे. (Jogendra Kawade on Congress Maha Vikas Aghadi)
“भुसावळ काँग्रेससोबत पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची 1997 पासून युती आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आलेले आहे. आमची काँग्रेसशी युती असल्याने आम्ही महाविकास आघाडी सरकारसोबत आहोत. मात्र सत्तेत असल्यावर जो वाटा मिळायला पाहिजे होता, तो अद्यापही आम्हाला मिळाला नाही” असं जोगेंद्र कवाडे यांनी स्पष्ट केलं.
काय म्हणाले जोगेंद्र कवाडे?
“महाविकास आघाडी सरकारचं आम्ही स्वागत केलं. काँग्रेससोबत आमची आघाडी असल्यामुळे पर्यायाने आम्ही महाविकास आघाडीचे घटकपक्ष आहोत. पण सत्तेत जो वाटा मिळाला पाहिजे, तो मिळत नाही. आम्ही वारंवार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केली. योग्य सन्मान मिळण्याची आमची अपेक्षा होती आणि तसं अभिवचनही आम्हाला मिळालं होतं. विधानपरिषदेवर नियुक्त केलेल्या आमदारांमध्ये आम्हाला वाटा मिळेल असं वाटत होतं.” असं जोगेंद्र कवाडे म्हणाले.
“राग नाही, मात्र खंत”
“सत्तेमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने मित्रपक्षांना सोबत घेऊन त्यांचा वाटा दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना पद दिले आहे. शिवसेनेने प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांना मंत्रिपद दिले, अहमदनगरचे नेते शंकरराव गडाख यांना मंत्रिपद दिले, तसे काँग्रेसकडून अद्यापही पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नेत्यांना कोणतेही मंत्रिपद देण्यात आले नाही. याचा आम्हाला राग नाही, मात्र खंत असल्याचे प्रा. जोगेंद्र कवाडे भुसावळमधील एका खासगी कार्यक्रमात म्हणाले.
मित्रपक्ष म्हणून आमचा सन्मान झाला पाहिजे, अभिवचनाचं प्रामाणिकपणे पालन केलं पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही आम्ही काँग्रेसला साथ दिली आहे. शिवसेना-राष्ट्रवादीने मित्रपक्षांचा सन्मान केला, तसा आम्हाला सत्तेत वाटा का नाही, याची खंत वाटते, राग नाही, पण खंत आहे, असं कवाडेंनी स्पष्ट केलं.
पाहा व्हिडीओ :
(Jogendra Kawade on Congress Maha Vikas Aghadi)