शिवसेनेतला विरोधी पक्ष पुन्हा जागा, उद्धव ठाकरेंच्या मनात चाललंय तरी काय?
भाजपप्रणित सत्तेत असूनही शिवसेनेतला विरोधी पक्ष पुन्हा जागा झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताच्या मुद्याआड भाजप धोरणांचा विरोध करणारी तज्ञ मंडळी शिवसेनेच्या व्यासपीठावर येऊ लागली आहे. शिवसेनेचे पुन्हा सत्ताधारी आणि विरोधक असं दोन्ही दगडांवर पायाचं धोरण सुरु झालंय.
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम सुरु होताच शिवसेना ‘फ्लॅशबॅक’ मध्ये गेली आहे. भाजपप्रणित सत्तेत असूनही शिवसेनेतला विरोधी पक्ष पुन्हा जागा झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताच्या मुद्याआड भाजप धोरणांचा विरोध करणारी तज्ञ मंडळी शिवसेनेच्या व्यासपीठावर येऊ लागली आहे. शिवसेनेचे पुन्हा सत्ताधारी आणि विरोधक असं दोन्ही दगडांवर पायाचं धोरण सुरु झालंय.
‘आमचं ठरलंय’ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा त्यावर किती विश्वास आहे हा सध्या संशोधनाचा विषय ठरावा. कारण 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या अनुभवातून शिवसेनेने बराच बोध घेतलाय. त्यामुळे ‘जबाबदारी आणि अधिकारांचं समसमान वाटप’, असा फॉर्म्युला उद्धव ठाकरे आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यात ठरला असला तरी यंदा मात्र शिवसेना गाफील नाही.
भाजपप्रमाणे शिवसेनेनेही विधानसभा निवडणुकीसाठी आपली तयारी सुरु केली आहे. त्या व्यूहरचनेत शिवसेनेने पुन्हा सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशा दोन्ही दगडांवर पाय ठेवल्याचे दिसत आहे. भाजप सरकारच्या धोरणांचा विरोध करणारी तज्ञ मंडळी शिवसेनेच्या व्यासपीठावर पुन्हा दिसू लागली आहे. अलीकडेच कृषीतज्ञ किशोर तिवारी यांनी उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे मंत्री-आमदारांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्गदर्शन केलं होतं. आपल्या भाषणात त्यांनी राज्य सरकारच्या शेतकरी धोरणांवर कठोर ताशेरे ओढले होते.
किशोर तिवारी यांच्यानंतर ज्येष्ठ पत्रकार आणि कृषीतज्ञ पी. साईनाथ यांनी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि आपली भूमिका स्पष्ट केली. भाजप सरकारच्या धोरणांवर समाधानी नसलेल्या देशातील मान्यवरांच्या यादीत पी. साईनाथ यांचं स्थान आहे. उद्धव ठाकरेंच्या सत्ताधारी आणि विरोधक अशा दुहेरी नितीबाबत पी. साईनाथ यांना विचारले असता, त्यांनी राजकीय पक्षांच्या व्यूहरचनेशी आपला संबंध जोडू नका अशी भूमिका मांडली.
केंद्रातील सत्तेत पुन्हा सहभागी होताना, राज्यात गेली पावणे पाच वर्षे सत्ता भाजपसोबत सत्ता उपभोगल्यानंतर आता शिवसेनेला भाजपच्या सत्तेचे साईड इफेक्ट्स नको आहेत. त्यामुळे भाजप सरकारच्या धोरणांचा राज्याच्या राजकारणात फटका बसू नये याची काळजी घेतली जात आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न हा केंद्रबिदू मानत उद्धव ठाकरेंनी आपली व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. भाजप सरकारच्या धोरणांचा विरोध करणारे आणखी काही चेहेरे पुढच्या काळात शिवसेनेच्या व्यासपीठावर आल्यास त्यात आश्र्चर्य वाटायला नको.