“मला काळजी करण्याचे कारण नाही, शरद पवार…”, हसन मुश्रीफांनी दिलेल्या चॅलेंजवर समरजीत घाटगेंचे प्रत्युत्तर
हसन मुश्रीफ यांनी निवडणुकीत "शरद पवार आपसे बैर नही, समरजीत अब तुम्हारी खैर नही”, असे वक्तव्य केले होते. आता समरजित घाटगे यांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे.
Samarjit Ghatge Vs Hasan Mushrif : भाजप नेते समरजित घाटगे यांनी काल कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीररित्या प्रवेश केला. कागलमधील गैबी चौकात त्यांच्या पक्षप्रवेशाचा भव्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला पक्षप्रमुख शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थित होते. समरजित घाटगे यांच्या शरद पवार गटातील पक्षप्रवेशानंतर आता त्यांचं कागल विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीचं तिकीट फायनल झालं आहे. यानंतर हसन मुश्रीफांनी समरजित घाटगेंना ओपन चॅलेंज दिलं होतं. आता समरजित घाटगे यांनी हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर दिले आहे.
हसन मुश्रीफ यांनी निवडणुकीत “शरद पवार आपसे बैर नही, समरजीत अब तुम्हारी खैर नही”, असे वक्तव्य केले होते. आता समरजित घाटगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली. “तुम्ही शरद पवारांवर जातीयवादचा आरोप केला आहे, याबद्दल महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. पुरोगामी विचाराची चळवळ तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही मला वाटेल ते बोला, पण शरद पवारांवर तुम्ही जातीयवादाचा जो आरोप केला आहे, त्याबद्दल तुम्ही जाहीर माफी मागा”, अशा शब्दात समरजित घाटगेंनी हसन मुश्रीफांवर निशाणा साधला.
“अजून दोन महिने काम करायचंय”
“येत्या काळात टप्प्या टप्प्यात आपण अनेक गोष्टी करु. कागल निवडणुकीत जनतेला निर्णय घ्यायचा आहे, तो जनता घेईल. कालच्या सभेमुळे विजय झाला असे अजिबात म्हणून नका, परिवर्तनाची मुहुर्तमेढ रोवली गेली. आपल्याला अजून दोन महिने काम करायचे आहे. ते पाच वेळा आमदार झाले आहेत, त्यामुळे मी निकाल जाहीर करत नाही. पण त्यांनी जे काही वक्तव्य केलं, त्यामुळे कागलमध्ये राहणाऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत”, असेही समरजित घाटगे म्हणाले.
“शरद पवारांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी”
“शरद पवार हे माझ्या पाठीशी आहेत. ते माझी पाठराखण करणार आहेत. शरद पवारांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे मला काळजी करण्याचे काहीही कारण नाही. अशा बऱ्याच धमक्या त्यांनी याआधीही मला दिल्या आहेत. संविधानाने सर्वांना बोलण्याचा अधिकार दिला आहे. पण मी या गोष्टींना फार गांभीर्य देत नाही. मी त्यांना शुभेच्छा देतो”, असे समरजित घाटगेंनी म्हटले.