जळगाव : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी तरुण चेहऱ्यांना उमेदवारी देणार असल्याचं पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केल्यानंतर तरुण कार्यकर्त्यांचा हुरुप वाढला आहे. महाराष्ट्रातील सर्वात तरुण सरपंच असलेल्या कल्पिता पाटील (Kalpita Patil meets Sharad Pawar) उमेदवारीसाठी सरसावल्या आहेत. पाटील यांनी शरद पवारांची भेट घेऊन जळगाव ग्रामीणमधून (Jalgaon Rural) निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली.
कल्पिता पाटील या जळगाव राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आहेत. धरणगाव तालुक्यातील कल्यानेहोळ गावच्या त्या सरपंच आहेत. महाराष्ट्रातील सर्वात तरुण वयात सरपंचपदाची धुरा त्यांनी सांभाळली आहे.
जळगाव ग्रामीण मतदारसंघामधून सध्या शिवसेनेचे गुलाबराव पाटील आमदार आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकरांचं आव्हान होतं. मात्र देवकरांना जळगाव घरकुल घोटाळ्यात पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे देवकरांचं तिकीट नाकारलं जाण्याची शक्यता आहे.
औरंगाबादमध्ये बोलताना शरद पवारांनी तरुणांना संधी देणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे कल्पिता पाटील (Kalpita Patil meets Sharad Pawar) यांनी उमेदवारीसंदर्भात शरद पवार यांनी भेट घेतली. पक्षाकडून त्यांना काम सुरु करण्यास सांगण्यात आल्याचीही माहिती आहे. कल्पिता पाटील यांनी फेसबुकवरुन तशी माहिती दिली आहे.
एकामागून एक आमदार राष्ट्रवादीची साथ सोडून जात असताना उमेदवारी कोणाला द्यायची हा प्रश्न शरद पवारांसमोर होता. त्यामुळे तरुणांना नेतृत्वाची संधी देण्याचा निर्धार पवारांनी बोलून दाखवला. बीड जिल्ह्यातून पवारांनी पाच उमेदवार घोषित केले असून त्यामध्ये चौघा तरुण उमेदवारांचा समावेश आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर
महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly Poll Dates) निवडणुकांचं बिगुल अखेर 21 सप्टेंबरला वाजलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे, तर गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. महाराष्ट्रातील सर्व 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या तारखा (Maharashtra Assembly Election Announcement) जाहीर केल्या. यासोबतच दोन्ही राज्यांत आचारसंहिता लागू झाली.