प्रियांका गांधी नमाज पठण करत होत्या ते खरं की आता मंदिराबाबत बोलतायेत ते खरं? स्मृती इराणी यांचा सवाल
Karnataka Assembly Election 2023 : प्रियांका गांधी नमाज पठण करत होत्या, स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर आरोप करत विचारला सवाल
बंगळुरू : कर्नाटकात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशात प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपकडूनही कर्नाटकातील स्थानिक नेत्यांसह केंद्रातील नेते प्रचार करत आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी बंगळुरूमध्ये पत्रकाप परिषद घेत काँग्रेसवर तोफ डागली आहे. तसंच काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्यावर टीकास्त्र डागलंय.
2019 मध्ये प्रियांका गांधी यांना रस्त्यावर नमाज अदा करताना पाहिले होतं. त्यामुळे इस्लाम धर्म मानणारे मूर्तीचे पूजक होऊ शकत नाहीत. मंदिर बांधू शकत नाहीत, असं स्मृती इराणी म्हणाल्या आहेत.
कर्नाटकात भाजपचंच सरकार!
कर्नाटक निवडणुकीवरही स्मृती इराणी यांनी भाष्य केलं आहे. कर्नाटकात भाजपचंच सरकार सत्तेत येणार असल्याचं स्मृती इराणी म्हणाल्या आहेत. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात समान नागरी कायदा आणण्याचं आश्वासन दिलं आहे. प्रत्येक धर्माच्या आणि प्रत्येक वर्गातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत, असं स्मृती इराणी म्हणल्या आहेत.
दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही कर्नाटकात प्रचार सभा झाली. कर्नाटकातील बल्लारी इथं मोदींनी सभेला संबोधित केलं. ‘जय बजरंग बली’ म्हणत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात ‘द केरला स्टोरी’चा सिनेमाही उल्लेख केला आहे.’द केरला स्टोरी’ ही केवळ केरळमधील आतंकवादी कारवायांवरचा चित्रपट आहे. पण ही केवळ एका राज्याची गोष्ट नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
भाजपचा जाहीरनामा
कर्नाटक निवडणुकीत भाजपने विविध योजना आणण्याचं आश्वासन दिलं आहे. वर्षात तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचं आश्वासन भाजपने दिलं आहे. प्रत्येक वॉर्डात अटल आहार केंद्राची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे. पोषण आहार योजने अंतर्गत प्रत्येक बीपीएल कार्डधारक कुटुंबाला अर्धा लिटर नंदिनी दूध देण्याचंही आश्वासन भाजपनं दिलं आहे. नागरिकांना स्वस्तात अन्न मिळणार आहे. कर्नाटकमध्ये एनआरसी लागू करण्याचंही आश्वासन भाजपने दिलं आहे. अवैध निर्वासितांना हद्दपार करू, असा शब्द भाजपने कर्नाटकच्या जनतेला दिला आहे.