करुणा धनंजय मुंडे म्हणतात, आमदारकीची निवडणूक लढवणार, आज महापौरांच्या भेटीला
करुणा शर्मा आता राजकारणात पाऊल टाकणार आहेत. तशी माहिती स्वत: करुणा शर्मा यांनी दिली आहे. करुणा यांनी आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली.
मुंबई : रेणू शर्मा प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी नातं मान्य केलेल्या करुणा शर्मा आता राजकारणात पाऊल टाकणार आहेत. तशी माहिती स्वत: करुणा शर्मा यांनी दिली आहे. करुणा यांनी आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली. आपण पी उत्तर विभागातील प्रश्न घेऊन आलो आहोत. स्वच्छतागृह आणि करचा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महापौरांची भेट घेतल्याचं करुणा यांनी सांगितलं. (Karuna Sharma wants to contest MLA elections)
धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर करुणा शर्मा या चर्चेत आल्या होत्या. रेणू शर्मा यांनी आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पुढे येत करुणा शर्मा यांच्याबद्दल स्वत:च माहिती दिली होती. जवळपास आठवडाभर हे प्रकरण चांगलंच तापलं होतं. पण रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतल्यानंतर हे प्रकरण शमलं. मात्र या संपूर्ण प्रकरणानंतर आता करुणा शर्मा यांनी सामाजिक कार्याकडे आपली वाटचाल सुरु केली आहे. करुणा या आधीपासून अनेक सामाजिक कामात पाहायला मिळाल्या होत्या.
‘आमदारकीची निवडणूकही लढवणार’
आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतल्यानंतर करुणा शर्मा यांनी आपण समाजसेविका आहोत. पुढे राजकारणातही येईल, असं सांगितलं. इतकंच नाही तर आपल्याला आमदारकीची निवडणूक लढवायची असल्याचा इशारा करुणा यांनी स्पष्ट केलाय. महापौरांची भेट घेऊन करुणा यांनी स्वच्छतागृह आणि कचऱ्याचा प्रश्न मांडल्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडेही एक तक्रार केली आहे. सोशल मीडियावर खलिफा डॉट कॉमसारख्या अॅप्लिकेशन्सवर फेसबुक आणि इतर समाजमाध्यमांवर अश्लील व्हिडीओ येत असतात, त्याविरोधात कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
‘वेळ येईल तेव्हा सगळ्या गोष्टी पुराव्यासह मांडणार’
गेली 25 वर्षे आपण घराबाहेर पडलो नाही. पण गेल्या 2 महिन्यांपासून घराबाहेर पडून बोलायला सुरुवात केली आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या घडामोडींविषयी केस असल्यानं कोर्टानं मला बोलण्यास मनाई केली आहे. मात्र, जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळ्या गोष्टी पुराव्यासह मांडेन, असा दावाही करुणा यांनी केला आहे.
पूजा चव्हाण असो की इतर कोणतीही मुलगी, तिला न्याय मिळायलाच हवा. माझ्यासोबत जे काही झालं त्यानंतर मीही आत्महत्येचा विचार केला होता. पण मरण्यापेक्षा आपण लढणं पसंत केल्याचं करुणा शर्मा म्हणाल्या. इथून पुढे आपण महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
धनंजय मुंडे यांची फेसबुक पोस्ट
धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडे यांनी एक फेसबूक पोस्ट लिहून बलात्काराचा आरोप फेटाळून लावला आहे. रेणू शर्मा आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र, हा आरोप फेटाळताना त्यांनी एका महिलेसोबत (रेणूची बहीण करुणासोबत) संबंध असल्याचं मान्य केलं आहे. आमचे परस्पर सहमतीने संबंध होते आणि त्यातून आम्हाला दोन अपत्य झाली आहेत. या मुलांना मी माझेच नाव दिले आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. परंतु, करुणा यांच्याशी विवाह झाल्याचं त्यांनी कबूल केलेलं नाही.
रेणू शर्माची तक्रार मागे
दरम्यान, 22 जानेवारीला राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला होता. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी धनजंय मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं होतं.
संबंधित बातम्या :
मोठी बातमी : करुणा शर्मांच्या तक्रारीवर धनंजय मुंडेंचा खुलासा
धनंजय मुंडे करुणासोबत संबंधात पण बहिण भावाकडून ब्लॅकमेलिंग?
Karuna Sharma wants to contest MLA elections