कसबा-चिंचवडमध्ये राज ठाकरेंची मनसे कुणाकडून? काँग्रेस उमेदवाराचा मोठा गौप्यस्फोट!
पुण्यामध्ये भाजप पाठोपाठ काँग्रेस नाराजी नाट्यवर पडदा पडल्याची चिन्ह आहेत. रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराज असलेले माजी मंत्री रमेश बागवे व अविनाश बागवे यांची समजूत काढण्यात आली आहे.
प्रदीप कापसे, पुणेः कसबा पेठ (Kasba peth) विधानसभा पोट निवडणुकीत (By Election) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरोधात भाजप अशी जोरदार लढत होणार असं चित्र आहे. या प्रमुख पक्षांसोबत इतर महत्त्वाचे पक्ष कुणाला पाठिंबा देणार, यावरही निकालाची गणितं अवलंबून असतात. विशेषतः राज ठाकरे यांची मनसे कुणाला पाठिंबा देणार, मनसे-भाजप दिलजमाई इथे दिसून येणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज ठाकरे यांनी माझा पुढील आदेश येईपर्यंत कार्यकर्त्यांना तटस्थ रहायला सांगितलं आहे. तर काँग्रेसचे कसबा पेठेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
काय म्हणाले रवींद्र धंगेकर?
कसबा पेठेचे काँग्रेस उमेदवार यांनी मोठ्या उत्साहात प्रचाराला सुरुवात केली आहे. काँग्रेस अंतर्गत गटबाजी मोडून काढण्यात त्यांना यश आलंय. फक्त काँग्रेसच नव्हे तर भाजप आणि मनसेतही माझे मित्र आहेत. या निवडणुकीत भाजप आणि मनसे कार्यकर्त्यांचीही मला साथ आहे, असा गौप्यस्फोट रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.
राज ठाकरे यांचे आदेश काय?
कसबा किंवा पिंपरी चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीत मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी कोणत्याही उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होऊ नयेत, असे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत. हे आदेश न पाळल्यास पक्षांतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे. मात्र रवींद्र धंगेकर यांच्या दाव्यानंतर मनसेबद्दल नवीच चर्चा सुरु आहे.
काँग्रेस नेत्याची नाराजी दूर..
पुण्यामध्ये भाजप पाठोपाठ काँग्रेस नाराजी नाट्यवर पडदा पडल्याची चिन्ह आहेत. रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराज असलेले माजी मंत्री रमेश बागवे व अविनाश बागवे यांची समजूत काढण्यात आली आहे. आत हे दोघेही कसबा पोटनिवडणूक काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर याच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत.बागवे यांनी आज रवींद्र धंगेकर यांनी बाईक रॅली काढली. यावेळी धंगेकर यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं
मनसेकडे कुणी मागितला पाठिंबा?
कसबा पेठेत हिंदू महासभेचे नेते आनंद दवे यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे. दवे यांच्या उमेदवारीने हिंदू मतांमध्ये फूट पडणार, असं म्हटलं जातंय. आनंद दवे यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ऑफर दिली आहे.
मनसेनं मला पाठिंबा द्यावा, त्यामुळे मनसेचा एक आमदार वाढेल, असं आवाहन आनंद दवे यांनी केलंय. मनसे आणि हिंदू महासंघाच्या भूमिकेतील समानता आनंद दवे यांनी अधोरेखित केली. मनसेनं कसबा निवडणुकीत मला पाठिंबा दिला तर माझा विजय सुकर होईल, असं वक्तव्य आनंद दवे यांनी केलंय.
भाजपच्या प्रचाराचा नारळ फुटला
दिवंगत भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ येथे पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची उद्याची शेवटची तारीख आहे. सध्या तरी ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, अशीच शक्यता दिसतेय. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध भाजप जोमाने प्रचाराला लागले आहेत. कसब्यातून भाजपचे उमेदवार हेमंत रासणे यांच्या प्रचारालाही आज धडाक्यात सुरुवात झाली. यावेळी सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील तसेच शैलेश टिळक उपस्थित होते.