‘सावरपाडा एक्स्प्रेस’ कविता राऊत विधानसभेच्या शर्यतीत?
धावपटू कविता राऊत राष्ट्रवादीच्या तिकीटावर नाशकातील इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई : आंतरराष्ट्रीय धावपटू आणि ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ म्हणून ओळखली जाणारी कविता राऊत (Kavita Raut) राजकीय शर्यतीत उतरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या तिकीटावर नाशकातील इगतपुरी-त्र्यंबकेश्वर (Igatpuri Triambakeshwar) विधानसभा मतदारसंघातून कविता राऊत निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेनेच्या संभाव्य उमेदवार निर्मला गावित यांना शह देण्यासाठी कविता राऊत यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीसाठी कोणताही प्रस्ताव आला नाही, मात्र आल्यास त्याबाबत सकारात्मक विचार करु, असं कविता राऊत यांचे पती महेश तुंगार यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना सांगितलं.
काँग्रेस आमदार निर्मला गावित यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. काँग्रेसकडून अद्याप उमेदवार निश्चित नसला, तरी कविता राऊतला राष्ट्रवादीने उमेदवारी द्यावी, अशी काँग्रेसची इच्छा असल्याचं बोललं जातं.
मूळ नाशिकची असलेली 34 वर्षीय कविता राऊत ही लांब पल्ल्याची धावपटू आहे. दहा किलोमीटरचे अंतर केवळ 34 मिनिटं 32 सेकंदात पार करण्याचा राष्ट्रीय विक्रम तिच्या नावे जमा आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत वैयक्तिक पदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला धावपटू ठरली होती.
आदिवासी कुटुंबातून आलेल्या कविताचं यश देदीप्यमान आहे. ज्या पाड्यात ती लहानाची मोठी झाली, त्याच नावाची बिरुदावली तिला देण्यात आली आहे.
दुसरीकडे, कविताने आशियाई स्पर्धेतही रौप्य पदकाची कमाई केली आहे. तिला अर्जुन पुरस्कारानेही गौरवण्यात आलं आहे. गेल्याच वर्षी कविताने मातृत्वसुखही अनुभवलं. त्यामुळे कविता आपली पुढची इनिंग राजकारणातून सुरु करणार का, अशी चर्चा आहे.