मुलुंडमध्ये 5000 खाटांच्या कोव्हिड रुग्णालयासाठी 12 हजार कोटींचा घोटाळा; किरीट सोमय्यांचा आरोप
मुलुंड येथे 5,000 खाटांचे कोव्हिड रुग्णालय उभारणीसाठी 22 एकर जमीन खरेदी करताना 12 हजार कोटींचा घोटाळा झाला आहे, असा गंभीर आरोप भाजप नेते डॉ. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. (Kirit Somaiya alleged 12000 crores scam in Covid hospital in Mulund)
मुंबई : मुलुंड येथे 5,000 खाटांचे कोव्हिड रुग्णालय उभारणीसाठी 22 एकर जमीन खरेदी करताना 12 हजार कोटींचा घोटाळा झाला आहे, असा गंभीर आरोप भाजप नेते डॉ. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. हा संपूर्ण व्यवहार संशयास्पद असून त्याची चौकशी लोकायुक्तांमार्फत करण्यात यावी, अशी मागणीदेखील सोमय्या यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. (Kirit Somaiya alleged 12000 crores scam in Covid hospital in Mulund)
किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी (30 ऑक्टोबर) राज्यपाल भगतसिहं कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी मुलुंड येथील कोव्हिड रुग्णालय उभारणीसाठी झालेला व्यवहार संशयास्पद असून त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी राज्यपालांकडे केली. तसे निवेदन सोमय्या यांनी राज्यपालांना दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बृहन्मुंबई महापालिका आयुक्तांना मुंबईत 5 हजार खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी तातडीने 22 एकर जागा अधिग्रहित करण्याचे आदेश दिले. हे आदेश देताना कोणत्याही पातळीवर चर्चा झाली नव्हती. रुग्णालय उभारण्याबाबतचा आवश्यक तो अहवालही (फिजिबिलीटी रिपोर्ट) तयार करण्यात आला नव्हता. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी जमीन अधिग्रहित करण्याचे आदेश पालिका अधिकाऱ्यांना दिले. या सर्व प्रक्रियेत, कोणती जमीन अधिग्रहित करायची याचा निर्णय आधीच झाला असावा. त्यानुसार मुलुंड येथील जमीन अधिग्रहित करण्याची प्रक्रिया अत्यंत जलदगतीने पार पाडली गेली, असे सोमय्या यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
तसेच, जमीन अधिग्रहित करण्यासाठी वृत्तपत्रांतून जाहिरात देऊन निविदा मागविण्याचे सोपस्कार पार पाडले गेले आणि स्वास कन्स्ट्रक्शन या कंपनीचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. या स्वास कन्स्ट्रक्शनकडे संबंधित जागेचे मालकी हक्क/ लीझ हक्क आहेत का? आदी कायदेशीर बाबींची पडताळणी न करताच या कंपनीचा प्रस्ताव मान्य केला गेला, असे कागदपत्रांची पाहणी केल्यावर दिसते, असा आरोपदेखील सोमय्या यांनी केला आहे.
राज्य सरकारकडे आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा नसल्याने कोव्हिड उपचारासाठी अन्यत्र उभारलेली जम्बो कोव्हिड केंद्रे खासगी डॉक्टरांकडे हस्तांतरित केली आहेत. असे असताना 5 हजार खाटांचे रुग्णालय चालविणे राज्य सरकार आणि महापालिकेला शक्य होणार आहे का?, याचा विचार न करताच रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला गेला. असा दावा सोमय्या यांनी केला आहे. तसेच, हा संपूर्ण व्यवहार संशयास्पद असून हा घोटाळा 12 हजार कोटींचा असावा, असा संशयही डॉ. किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे. या रुग्णालयाच्या उभारणीचा खर्च मुंबईकरांनी भरलेल्या कराच्या रकमेतून होणार असून मुंबईकरांनी हा भुर्दंड का सोसावा? असा प्रश्नही सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
दरम्यान, याबाबतची सर्व कागदपत्रे पाहून त्यावर योग्य ती कार्यवाही करू, असे आश्वासन राज्यपाल भहतसिंह कोश्यारी यांनी आपल्याला दिले असल्याचे डॉ. किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.
संबंधित बातम्या :
Kirit Somaiya | आरे कारशेड हलविल्यामुळे खर्च वाढणार : किरीट सोमय्या
(Kirit Somaiya alleged 12000 crores scam in Covid hospital in Mulund)