सोमय्यांना जखम झाल्यावर रक्त आलच नाही! जखमही अवघी 0.1 सेंटीमीटरची, मेडिकल रिपोर्टमधून मोठा खुलासा
Kirit Somaiya Car attack injury : सोमय्यांना जखम झाल्यावर रक्तस्त्राव झाला नाही असंही वैद्यकीय अहवालात (Medical Report) नमूद करण्यात आलंय.
मुंबई : किरीट सोमय्या हल्लाप्रकरणी (Kirit Somaiya Car attacked) मोठी बातमी येते आहे. भाजपन नेते किरीट सोमय्यांना किरकोळ जखम झाल्याचा अहवाल भाभा रुग्णालयाचा अहवाल दिला आहे. सोमय्यांना जखम झाल्यावर रक्तस्त्राव झाला नाही, असंही वैद्यकीय अहवालात (Medical Report) नमूद करण्यात आलंय. किरीट सोमय्यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर अहवाल समोर आला. सोमय्यांना गंभीर इजा नसल्याची माहिती भाभा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. त्यामुळे आता किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या हनुवटीला दिसत असणाऱ्या रक्तावरुन नवा वाद होण्याची शक्यता आहे. शनिवारी खार पोलिस स्थानकाबाहेर किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर माध्यमांनी टिपलेल्या दृश्यांमध्ये किरीट सोमय्या यांच्या हनुवटीतून रक्त वाहत असल्याचं दिसून आलं होतं. सोमय्यांच्या गाडीची काच दगडफेकीत फुटली होती. त्यात त्यांना जखम झाली असल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं होतं. दरम्यान, किरीट सोमय्यांची जखमी खरी आहे की खोटी, अशी शंका घेतली जात होती. त्यावर आता भाभा रुग्णालयानं दिलेल्या मेडिकल रिपोर्टनं मोठा खुलासा केलाय.
मेडिकल रिपोर्टमध्ये काय?
भाभा रुग्णालयानं दिलेल्या रिपोर्टमध्ये दावा सांगण्यात आलं आहे की, किरीट सोमय्यांना 0.1 सेंटीमीटरची जखम झाली असल्याचे रिपोर्टमध्ये आढळून आले आहे. सूज आणि रक्तस्त्राव झालेला नाही. हा अहवाल आता पोलिसांनी सादर करण्यात आला आहे.
रक्तस्त्राव नाही, मग ते काय?
भाभा रुग्णालयानं दिलेल्या मेडिकल रिपोर्टमध्ये सोमय्या यांना किरकोळ जखम झाल्याचं स्पष्ट केलंय. तसंच सोमय्या यांना कोणताही रक्तस्त्राव झाला नाही, असंही म्हटलंय. त्यामुळे आता सोमय्यांच्या व्हिडीओमध्ये दिसत असणारी जखमी खोटी होती का, असा प्रश्न पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे.
राऊत म्हणाले होते, हा तर टोमॅटो सॉस…
संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्यांचं नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला होता. एक वेडा माणून ओठाखाली टोमॅटो सॉस लावून राष्ट्रपती राजवटीची मागणी करत असेल, तर त्याकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही, असं ते म्हणाले होते. दरम्यान, सोमवारी किरीट सोमय्यांनी आपल्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी केंद्रीय गृहसचिवांचीही भेट घेतली होती. नवी दिल्लीत भाजपच्या शिष्टमंडळानं केंद्रीय गृहसचिवांची भेट घेत महाराष्ट्रातील घडामोडींबाबत तक्रारी नोंदवल्या होत्या.
शनिवारी काय झालं होतं?
शनिवारी किरीट सोमय्या हे अटक करण्यात आलेल्या नवनीत राणा रवी राणा यांची भेट घेण्यासाठी गेले. खार पोलीस स्थानकात भेट घेऊन झाल्यानंतर भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यावेळी दगडफेक आणि चप्पलफेक करण्यात आली. त्यात एक दगड किरीट सोमय्यांच्या गाडीवर भिरकावला गेला. त्यात किरीट सोमय्यांना जखम झाली होती. यानंतर घेण्यात आलेल्या पोलीस तक्रारीवरुनही सोमय्यांनी टीका केली होती. संजय पांडे यांनी खोटी एफआयआर नोंदवून घेतल्याची टीका सोमय्यांनी केली होती.