कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करण्यासाठी किरीट सोमय्या कोल्हापूरला जात आहेत. मात्र, यापूर्वी त्यांनी कोल्हापूर दौरा घोषित केला त्यावेळी त्यांच्यावर कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हाबंदी लागू करण्यात आली होती. पण आता सोमय्यांवरील ही जिल्हाबंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांचा कोल्हापुरात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Kolhapur District Collector withdraws district ban order on BJP leader Kirit Somaiya)
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी किरीट सोमय्या यांच्यावरील जिल्हाबंदी उठवली आहे. सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. त्यानंतर सोमय्या यांनी कोल्हापुरात जात मुश्रीफांविरोधात तक्रार दाखल करण्याची घोषणा केली होती. मात्र, सोमय्यांना नोटीस बजावत जिल्हाबंदी लागू करण्यात आली होती. तसंच त्यांना निवासस्थानी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर रोखण्याचा प्रयत्नही झाला होता. त्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर आता सोमय्या हे मंगळवारी (28 सप्टेंबर) कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहे. हिम्मत असेल तर मला अडवून दाखवा, असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय. या पार्श्वभूमीवर आता सोमय्यांवरील जिल्हाबंदी उठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, हसन मुश्रीफ यांनी सोमय्या यांच्यावरील जिल्हा बंदी उठवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती.
केंद्र सरकारनं ठाकरे सरकार आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी, पोलिसांना नोटीस पाठवली की जर किरीट सोमय्यांची गनिमी काव्यानं हत्या करण्यात येणार होती तर त्याची माहिती आम्हाला का दिली नाही? आणि ते कोण करणार होतं ते शोधून काढावं. मी जिल्हाधिकारी, एसपी आणि ठाकरे सरकारला सोडणार नाही. गेल्यावेळी खोट बोलून त्यांनी तो प्रतिबंधात्मक आदेश काढला होता. त्यांना उत्तर द्यावंच लागणार. ठाकरे सरकारमध्ये दम नाही किरीट सोमय्यांना थांबवण्याचा. मोदींच्या आदेशाप्रमाणे आम्ही घोटाळामुक्त महाराष्ट्र करु, अशी प्रतिक्रिया सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्हाबंदी उठवल्यावर दिला आहे.
तर सोमय्या यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना चिथावणीखोर वक्तव्य करु नयेत. त्यांनी आमचं सामाजिक काम पाहावं, असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. त्याचबरोबर आपले समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्यासंही मुश्रीफ यांनी सांगितलं आहे.
तत्पूर्वी, आज दुपारी किरीट सोमय्या यांनी सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. त्यावेळी मी कोल्हापूरला अंबेमातेच्या दर्शनासाठी जात आहे. कोल्हापुरात अंबाबाईला प्रार्थना करणार की, तू शक्तीची माता आहे. तू पापाच्या राक्षसाचा वध केला होता. अंबेमातेच्या चरणी प्रार्थना करणार की भ्रष्टाचाररुपी राक्षस जो महाराष्ट्रात फोफावला आहे, त्याचा वध करण्याची शक्ती आम्हाला दे. त्यावेळी पत्रकारांनी सोमय्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला मागच्या वेळी पोलिसांनी कुठली नोटीस दिली आहे का? त्यावर सोमय्या म्हणाले की आता मी त्यांना नोटीस दिली आहे. मी शरद पवारांना नोटीस दिली, मी उद्धव ठाकरेंना नोटीस दिली. मी कोल्हापूरच्या पोलीस आयुक्तांना सांगितंल, कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्याला सांगितलं की, तुमच्यात हिम्मत असेल तर मला थांबवून दाखवा. आम्ही जाणार, अंबाबाईचं दर्शन घेणार आणि त्या भ्रष्टाचाररुपी राक्षसाचा वध करणार, असा इशाराही सोमय्या यांनी यावेळी दिलाय.
इतर बातम्या :
आता टार्गेट रश्मी ठाकरे! उद्धव ठाकरेंनी बंगले घेण्यासाठी रश्मी वहिनींचा वापर केला; सोमय्यांचा घणाघात
Video : पुणे महापालिकेच्या मुद्रणालयात दारु पार्टी! सुरक्षा रक्षकासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग?
Kolhapur District Collector withdraws district ban order on BJP leader Kirit Somaiya