ठाकरे परिवाराचे 19 बंगले कुठे गेले? किरीट सोमय्यांचा पुन्हा हल्लाबोल, काय भूमिका?
आज पुन्हा एकदा किरीट सोमय्या याप्रकरणी सक्रिय झाल्याचं दिसून येतंय. आज ते अलिबाग येथील सीईओंचा भेटणार आहेत.
रायगड, अलिबागः ठाकरे (Thackeray) परिवाराचे 19 बंगले कुठे गेले? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी विचारला आहे. आज या मुद्द्यावरून सोमय्या पुन्हा एकदा हल्लाबोल करणार आहेत. 2022 या वर्षाच्या सुरुवातीला किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या कुटुंबीयांच्या संबंधित 19 बंगल्यांवरून रान उठवलं होतं. अलिबाग येथील बंगले रश्मी ठाकरे यांच्याशी संबंधित अन्वय नाईक यांनी 2009 मध्ये हे बंगले बांधले.2014 मध्ये ठाकरे कुटुंबीयांनी ते विकतली घेतले, मात्र आता हे बंगले गायब केले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय.
किरीट सोमय्या या प्रकरणी आज अलिबाग येथील सीईओ यांना भेटणार आहे. यासंबंधीचं ट्विट त्यांनी केलंय.
ठाकरे परिवाराचे अलिबाग येथील १९ बंगले गेले कुठे
अन्वय नाईक नी २००९ मधे १९ बंगले बांधले, ठाकरे परिवाराने २०१४ मधे विकत घेतले, नावावर केले, ८ वर्ष प्रॉपर्टी टेक्स भरला
आम्ही हा घोटाळा उघडकीस आणला
नंतर ठाकरे सरकारनी बंगले गायब केले !?
आज १२ वाजता अलिबाग येथे मी CEO ना भेटणार
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 12, 2022
काय आहे प्रकरण?
किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांनुसार, 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी अलिबाग येथील कोर्लई ग्रामपंचायतीतील 19 बंगले स्वतःच्या नावावर करण्यासाठी पत्र लिहिले होते. हे पत्रदेखील किरीट सोमय्या यांनी माध्यमांमध्ये शेअर केलं होतं.
त्यानंतर हे बंगले रश्मी ठाकरे यांच्या नावावर झाले 2020 मध्ये त्यांनी 19 बंगल्यांचा मालमत्ता करही भरल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी हा कर भरला आहे. एवढंच नाही तर त्यापूर्वीची दोन वर्षे रश्मी ठाकरे यांनी आणि त्याआधी सहा वर्षांचा मालमत्ता कर अन्वय नाईक यांनी भरल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
हे बंगले रश्मी ठाकरे यांच्यासंबंधित असतानाही ते आता दिसत नाहीत, ते गायब केले आहेत का, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केलाय. महाविकास आघाडी सरकारच्या काळात किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण जोरदारपणे लावून धरलं होतं.
त्यानंतर एकनाथ शिंदे यांचं बंड तसंच शिंदे-भाजप सरकार आल्यानंतर यावरील आरोप-प्रत्यारोप शांत झाले होते. आज पुन्हा एकदा किरीट सोमय्या यावरून सक्रिय झाल्याचं दिसून येतंय. आज ते अलिबाग येथील सीईओंचा भेटणार आहेत.