प्रमुख राजकीय पक्षांनी नाकारलं, बांबूच्या टोपल्या विकणाऱ्या आईचा मुलगा अपक्ष आमदार
कोणतीही निवडणूक म्हटली की प्रस्थापित नेते विरुद्ध राजकारणातील अप्रस्थापित असा लढा असतो. त्यात नव्याने आलेला कोणताही राजकीय वारसा आणि वलय नसलेल्या उमेदवारांसाठी तर या निवडणुकीत यश मिळवणे महाकठिण असते.
चंद्रपूर : कोणतीही निवडणूक म्हटली की प्रस्थापित नेते विरुद्ध राजकारणातील अप्रस्थापित असा लढा असतो. त्यात नव्याने आलेला कोणताही राजकीय वारसा आणि वलय नसलेल्या उमेदवारांसाठी तर या निवडणुकीत यश मिळवणे महाकठिण असते. अशाच खडतर प्रवासानंतर चंद्रपूरमध्ये बांबूच्या टोपल्या विकणाऱ्या महिलेचा मुलगा आमदार (Son of Bamboo basket Seller become MLA from Chandrapur) म्हणून निवडून आला आहे. किशोर जोरगेवार हे चंद्रपूरमधून अपक्ष उमेदवार होते.
चंद्रपूर मतदारसंघात अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी भाजपचे उमेदवार आणि आमदार नाना शामकुळे याचा तब्बल 73 हजार मतांच्या फरकाने पराभव केला. त्यानंतर चंद्रपूरमध्ये जोरगेवार यांच्या विजयाचा मोठा जल्लोष करण्यात आला. त्यांच्या समर्थकांनी किशोर जोरगेवार यांना हार-तुरे घालून आनंद साजरा केला. विशेष म्हणजे बांबूच्या टोपल्या विकण्याचा व्यवसाय करणाऱ्या जोरगेवार यांच्या आईला मुलाचा विजय झाल्याचं समजल्यानंतर अश्रू अनावर झाले. आईच्या डोळ्यात अश्रू पाहून जोरगेवार देखील काहीवेळ भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
जोरगेवार यांनी आपल्या गळ्यातील सर्व हार आईच्या गळ्यात घालून आपला विजय आईला समर्पित केला. हे दृश्य पाहून त्या ठिकाणी उपस्थित अनेकांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. किशोर जोरगेवार हे अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून संघर्ष करत आमदार झाल्याचं सांगितलं जातं. किशोर जोरगेवार यांची आई आज देखील चंद्रपूर शहरातील गांधी चौकात रस्त्याच्या कडेला बसून बांबूच्या टोपल्या विकते. याच परिस्थितीच्या जाणीवेमुळे जोरगेवार यांच्या आईच्या डोळ्यात अश्रू आल्याचं उपस्थितांनी सांगितलं.
आपल्या विजयाबाबत बोलताना अपक्ष आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, “मागील 15 वर्षांपासून मी चंद्रपूरमध्ये काम करतो आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी माझ्यावर अन्याय केला. या पक्षांनी मला फसवलं आहे. हे सर्व जनता पाहात होती. मी जनतेच्या प्रश्नांसाठी जी आंदोलने केली, जी कामं केली, ती जनतेने पाहिली आणि मला संधी दिली.” चंद्रपूरच्या जनतेचा डगमगलेला विश्वास पुन्हा आणणे याला माझी प्राथमिकता असणार आहे. प्रगती करण्यासाठी आत्मविश्वास असणं महत्त्वाचं आहे. तसेच पुढील काळात वीज, रस्ते आणि पाणी यावर काम करणार असल्याचंही जोरगेवार यांनी सांगितलं. जमिन पट्ट्यांच्या प्रश्नावरही काम करणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.