शिंदे गटाची गर्दी, शिंदेचं स्क्रीप्ट आणि दारुच्या बाटल्या! किशोरी पेडणेकरांनी सगळंच काढलं
स्वतःहून माणसं ऐकायला येणं आणि माणसं आणणं, यात फरक असतो असंही मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय.
सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई : माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishor Pednekar) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटावर सडकून टीका केली. दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणाच्या स्क्रिप्टवरुन त्यांनी टोला लगावला. तसंच बीकेसीत (BKC Dusshera Melava Eknath Shinde Speech) शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात झालेल्या सगळ्यांच गोष्टींवर पेडणेकर यांनी हल्लाबोल केला.
धक्कादायक बाब म्हणजे बीकेसीत शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यानंतर तिथे दारुच्या बाटल्या पडलेल्या होत्या.नको त्या वस्तू तिथे आढळून आल्यानं, ही पण सोय तिकडे केली होती का, असा थेट सवाल पेडणेकर यांनी उपस्थित केलाय.
बीकेसीवर दारुच्या बाटल्या आढळून आल्यामुळे आता त्यावर कारवाई करणार का? असा प्रश्नही त्यांनी एकनाथ शिंदे यांना उपस्थित केलाय. विचारांचा मेळावा होता, तर मग असं कसं झालं? असा प्रश्न त्यांनी शिंदे गटाला विचारला. त्या मुंबईत पत्रकारांशी बोलत होत्या.
स्क्रिप्टवरुन टोला
शिंदे साहेबांना आम्ही ओळखतो, हे त्यांचं भाषण नाही, असं किशोरी पेडणेकर यांनी यावेळी म्हटलं. आमची स्क्रिप्ट बदलणार नाही, कारण आमची स्क्रिप्ट नसून आमचा संवाद होता. कालच्या स्क्रिप्ट तुम्ही लिहिलेल्या होत्या, हे समोर आल्याचंही त्यांनी म्हटलं. उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर एकनाथ शिंदे यांना भाषण करायला सांगण्यात आल्याचाही टोला त्यांनी लगावला.
उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत, एवढं तरी तुम्ही मानत आहात का? शिवसेना संपली असं म्हणत होतात, पण कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिलं की जे गेले त्यांनी काही होत नाही, असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं.
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात महिला रडत होत्या, त्यांच्या कोणत्याही खाण्यापिण्याची सोय नव्हती. वयोवृद्ध लोकांची गैरसोय झाल्याचाही आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला.
पाहा व्हिडीओ :
एका बाजूला सत्ता आणि पैसा, तसंच केंद्राचं पाठबळ. तर दुसऱ्या बाजूला सामान्य शिवसैनिक ‘आमचे पैसे आमची भाकरी, आम्ही उद्धव ठाकरेंचे विचार ऐकायलो आलो आहोत’, असं सांगत असल्याचं सगळ्यांनी पाहिलं, असंही किशोरी पेडणेकरांनी यावेळी म्हटलं.
बीकेसीत अजूनही घाण आहे. शिवाजी पार्कवर जाऊन बघा, महापालिकेने त्वरीत साफसफाई केली असल्याचंही पेडणेकरांनी यावेळी म्हटलं. स्वतःहून लोकं ऐकायला येणं आणि माणसं आणणं यात फरक आहे, असंही त्या म्हणाल्या. कोणाला फसवत आहात आणि कशासाठी हे सगळं करत आहात, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.