अमृता फडणवीसांना आवरा, किशोर तिवारींचं भय्याजी जोशींना पत्र
शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भय्याजी जोशी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी अमृता फडणवीसांना आवरा, असं म्हटलं आहे.
नागपूर : शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भय्याजी जोशी यांना पत्र लिहिलं आहे (Kishor Tiwari on Amruta Fadnavis). या पत्रात त्यांनी अमृता फडणवीसांना आवरा, असं म्हटलं आहे. अमृता फडणवीस यांनी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा उल्लेख रेशीम किडा असा केला होता. त्यावरुन आता राजकारण पेटलं आहे. त्यामुळेच किशोर तिवारी यांनी भय्याजी जोशींना पत्र लिहून अमृता फडणवीसांना आवरा, अशी मागणी केली.
किशोर तिवारी म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे, नितीन गडकरी, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे यांच्यासारखे अनेक नेते राजकीय क्षेत्रात सक्रीय आहेत. त्यांच्या पत्नी देखील सामाजिक कामात सहभागी होतात. मात्र, त्यांनी नवऱ्यासाठी अशा राजकीय विषयांवर टीका केली नाही. अशी कोणतीही संस्कृती नाही.”
Refrain Denvendra and Amrita Fadanvis -Kishore Tiwari to RSS pic.twitter.com/eAl2xDtX1X
— kishor Tiwari (@kishortiwari) February 27, 2020
भय्याजी जोशींनी म्हटलं होतं की दोन महिन्यांनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. मात्र, हे जर असे वाद निर्माण करत असतील तर ते कसे मुख्यमंत्री होतील? अमृता फडणवीस या आवश्यकतेपेक्षा अधिक यावर प्रतिक्रिया देत आहेत. त्यांची विधानं राजकीय समीकरणांमध्ये विष कालवणारी आहेत. त्यांची लिहिण्याची भाषा देखील चुकीची आहे. कुणाला किडा वगैरे म्हणणं हे वेदनादायक असतं. हे शब्द परत घेतले जात नाहीत. इतका अहंकार नसायला हवा, असंही किशोर तिवारी यांनी नमूद केलं.
‘हिंदुत्ववादी पक्षांशी प्रेम टिकवायचं असेल, तर यांना आवरा’
किशोर तिवारी म्हणाले, “जर तुम्हाला हिंदुत्ववादी पक्षांशी प्रेम टिकवून ठेवायचं असेल, तर या लोकांना आवरा, अशी मी मागणी केली आहे. निवडणुकीनंतर रात्रीचा शपथविधी देवेंद्र फडणवीस यांच्या अंगावर आला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा तोल गेला आहे. फडणवीस आता प्रत्येकवेळी घसरून बोलत आहेत. मात्र, अशावेळी देवेंद्र फडणवीसांना वाचवण्यासाठी भाजपमधील कोणीही येताना दिसत नाही. अचानकपणे त्यांच्या पत्नी ट्विटरवरुन काहीतरी लिहितात आणि वाद निर्माण करतात.”
कोण आहेत किशोर तिवारी?
किशोर तिवारी हे राज्याच्या स्वाभिमानी शेतकरी मिशनचे अध्यक्ष आहेत त्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा आहे. तिवारी हे संघाचे स्वयंसेवक आहेत त्यांनी शेतकऱ्यांसाठी विदर्भात काम केलं आहे आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने केली
Kishor Tiwari on Amruta Fadnavis