Kishori Pednekar : ईडी लागली म्हणून भाजपा हवी, चांगलं चाललेलं घर मोडलं; शिवसेनेच्या बंडखोरांना किशोरी पेडणेकरांनी सुनावलं
तीव्र चीड आणि वाईट वाटते आहे. ते म्हणतात आम्ही शिवसैनिक आहोत. मात्र केवळ सत्तेसाठी तुम्ही हे केले. उद्भवजींसोबत जनता आहे. बाळासाहेबांचा विचार हा पुढे जात राहील, त्यासाठी असे बंड गरजेचे होते का, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
मुंबई : कोविडकाळात दिलासा देणाऱ्या संयमी, सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांना गमावल्याचे महाराष्ट्राच्या जनतेला दुःख आहे, अशी भावना शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे काल अखेर उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करून शिवसेनेचे 39 आमदार फोडले. त्यासोबतच इतर काही अपक्षही सोबत असल्याचा दावा केला. या सर्वांनीच महाविकास आघाडीचा पाठिंबा काढल्याचे जाहीर केले. त्यानंतर अल्पमतात आलेल्या महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेने आपले मुख्यमंत्रीपद गमावले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना तर भावनिक झाली आहेच, मात्र राज्यातील जनतेतही या राजकारणाविषयी चीड व्यक्त होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर किशोरी पेडणेकर यांनी टीव्ही 9कडे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
‘…त्यासाठी असे बंड गरजेचे होते का?’
तीव्र चीड आणि वाईट वाटते आहे. ते म्हणतात आम्ही शिवसैनिक आहोत. मात्र केवळ सत्तेसाठी तुम्ही हे केले. उद्भवजींसोबत जनता आहे. बाळासाहेबांचा विचार हा पुढे जात राहील, त्यासाठी असे बंड गरजेचे होते का, असा सवाल त्यांनी केला आहे. कारणे देऊ नका. जे झाले त्याला संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे. मुंबई महापालिका अडचणीची असली, तरी अडचणींवर मात करून पुढे निघायचे असते, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
‘प्रबोधनकारांच्या विचारांना राज ठाकरेंकडून फाटा’
राज ठाकरे यांनी प्रबोधनकारांच्या विचारांना फाटा दिला. संजय राऊत म्हणतात ते बरोबर आहे. स्वतः मुख्यमंत्री बनवून दाखवा, असे ते म्हणाले होते. चांगले चाललेले घर तुम्ही मोडून काढले. ईडी लागली म्हणून भाजपा हवी. भाजपा सोबत असताना तुमच्या याच कुरबुरी होत्या, असा आरोप त्यांनी बंडखोरांवर करत आता गेल्या घरी सुखी रहा, असे सुनावले. कोविड काळात मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने कारभार हाताळला, जनता त्यांना कायम लक्षात ठेवेल, असेही त्यांनी सांगितले.