शिंदे आणि भाजप समर्थक दोन आमदारांचं वाजलं; किशोरी पेडणेकर यांनी घेतली एकाची बाजू; दुसऱ्याबद्दल म्हणाल्या…
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर देवी देवतांचे फोटो लावण्याची मागणी केली आहे. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नोटांवर सर्वच देवी देवतांचे फोटो लावा.
मुंबई: शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू (bacchu kadu) आणि भाजप समर्थक आमदार रवी राणा (ravi rana) यांच्यात चांगलच वाजलं आहे. खोके घेण्यावरून दोन्ही आमदारांमध्ये जोरदार शाब्दिक चकमकी झडत आहेत. एवढंच नव्हे तर हे प्रकरण आता पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढली आहे. बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात जुंपलेली असतानाच ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी या भांडणात उडी घेत रवी राणा यांना डिवचले आहे.
किशोरी पेडणेकर यांनी मीडियाशी संवाद साधताना रवी राणा यांना चांगलेच डिवचले आहे. सध्या राज्यात नौटंकी सुरू आहे. सी ग्रेडपासून वर येण्यासाठी काय काय सुरू आहे. हे आपण पाहतच आहोत. ते तर नौटंकी दाम्पत्य आहे. बच्चू कडू हे चांगले व्यक्तिमत्त्व आहे. ते राणांना पुरून उरतील, अशा शब्दात किशोरी पेडणेकर यांनी राणा यांना डिवचले.
उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ आदित्य ठाकरे हे सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही रस्त्यावर उतरलोय. उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. शेतकऱ्यांसाठी जे करायला हवं ते आमचे नेते करत आहेत. आमचे दौरे घड्याळ्याच्या काट्यावर मोजले जात आहेत. पण आमचे दौरे घर टू ऑफिस आणि ऑफिस टू घर नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर देवी देवतांचे फोटो लावण्याची मागणी केली आहे. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नोटांवर सर्वच देवी देवतांचे फोटो लावा. त्यामुळे किमान डॉलर तरी वधारेल. कोणत्याही निमित्ताने का होईना पण नोटांवर शिवाजी महाराज आणि देवी देवतांचे फोटो लावण्याची मागणी होतेय हे चांगलं आहे. आमचं तर म्हणणं आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोवर लावला पाहिजे, असं त्या म्हणाल्या.
भाजपकडे आता पैसे जास्त झाले आहेत. म्हणून बैल घोडा विकत घेतल्यासारखे ते माणसं विकत घेत आहेत, अशी टीका त्यांनी केली. आदित्य ठाकरेंवर बाळासाहेबांचे, प्रबोधनकारांचे, रश्मी ठाकरे यांच्या विचारांचा प्रभाव आहे. ते कधीच पातळीसोडून बोलत नाहीत. तुमच्या शब्दात तुम्हाला उत्तर दिलं तर त्रास होतो. याला पातळी सोडून बोलणं कसं म्हणायचं? असा सवाल त्यांनी एका प्रश्नावर केला.