मुंबईः खरं तर राजीनामा मंजूर करण्यासाठी एक दिवसही पुरेसा आहे. पण मुंबई महापालिका (BMC) एका क्लार्कच्या राजीनाम्यासाठी एवढा अट्टहास का करतेय, असा सवाल महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केला आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नीला शिवसेनेला उमेदवारी द्यायची आहे. मात्र पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) या महापालिकेत क्लार्क असून त्यांचा राजीनामा पालिकेच्या वतीने मंजूर केला जात नाहीये.
ऋतुजा लटके यांनी आता राजीनाम्यासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. यावर काही वेळातच निर्णय येणं अपेक्षित आहे.
दरम्यान, महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भाजप-शिंदे सेनेचा दबाव असल्याने ऋतुजा लटकेंचा राजीनामा लांबवण्यात येतोय, असा आरोप शिवसेनेकडून करण्यात येतोय.
किशोरी पेडणेकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, ‘ त्या पोटनिवडणूक लढवत आहेत. स्वेच्छेने राजीनामा मागितलाय. महापालिकेकडून त्यांच्याविरोधात काहीच तक्रारी नाहीत. एका क्लर्कसाठी एवढा अट्टहास का? महाराष्ट्रात जे चाललंय, त्यात तुमचा सहभाग का असावा? असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केलाय.
दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान देण्याकरिताही महापालिकेकडून अशीच आरेरावी केली गेली, याची आठवण पेडणेकर यांनी केली. त्या म्हणाल्या, ‘ मागील वेळी शिवाजी पार्क मैदानासाठीही अशीच आरेरावी केली. परत महापालिका तोंडावर पडली. १५० वर्ष पूर्ण केल्याचा महापालिकेचा इतिहास आहे. तो संपवण्याचा प्रयत्न काही अधिकाऱ्यांमार्फत होतोय.
विश्वनाथ महाडेश्वरांना उमेदवारीसाठी शिवसेना असं करतंय, असा आरोप केला जातोय. त्याला प्रत्युत्तर देताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ‘ शिवसेना इतक्या घाणेरड्या पद्धतीने वागणार नाही. ऋतुजा लटके याच उमेदवार आम्हाला हव्या आहेत. मात्र हे सगळ्या बाजूंनी कोंडी करत आहेत. हा राजकारणाचा ऱ्हास करण्यासारखं आहे. राजकारणातला सुसंस्कृतपणा संपतोय, असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केलाय.