मुंबई : एकीकडे उद्धव ठाकरेंना बहुमत चाचणीला (Uddhav Thackeray Floor Test) सामोरं जावं लागण्याची मोठी बातमी समोर आलेली असतानाच, आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना पत्रातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रामुळे एकच खळबळ उडालीये. याप्रकरणी आता पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हटलंय. अत्यंत गलिच्छ भाषेत या पत्रातून धमकावण्यात आलंय, असं त्यांनी म्हटलंय. उरणमधून (Maharashtra Political crisis) हे धमकीचं पत्र आलं असल्याचं सांगितलं जातंय. लोअर परळ येथील घरी पालिका अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत असताना एक मुलगी पत्र घेऊन आली होती. हे पत्र उघडून पाहिल्यानंतर सगळेच हादरलेत. निळ्या पेनानं हे पत्र लिहिण्यात आलं होतं. याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांनी संतापही व्यक्त केलाय. महाराष्ट्रात जणू काही मुघलाई असल्याचं भासवलं जाण्याचा प्रयत्न या पत्रातून केला जात असल्याची टीका त्यांनी केली. तसंच या पत्राने आम्ही घाबरणारे नाही, असंही त्या म्हणाल्यात.
किशोरी पेडणेकर यांनी धमकीचं पत्र आल्यानंतर टीव्ही 9 मराठीनं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतील. यावेळी फोनवरुन संपर्क साधला असता किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय की…
मी लोअर परळच्या माझ्या घरी होते. दोन पोलिकेचे अधिकाऱ्यांसोबत माझी चर्चा सुरु होती. एक मुलगी पत्र घेऊन आली, पत्र उघडलं, पाहिलं तर पेनाने लिहिलंय. मागे माझं चित्र लावलंय. छोटा एक फोटो क्रॉप केलंय. उरणच्या आमदारांचा आणि त्यांच्या बायकोचा फोटो क्रॉप केलाय. निळ्या पेनाने हे पत्र लिहिलंय. नाव आणि पत्ताही आहे. हा पत्र लिहिणारा दिशाभूल करतोय. असे माथेफिरु समाजात असतील आणि उगाचच धमकावत असतील, तर याची दखल घेतली पाहिजे. आदित्य ठाकरेंनाही धमकी दिली आहे.. जसं काय महाराष्ट्रात मुघलाई आली आहे, अशा पद्धतीने पत्र आलंय. जाणूनबुजून कुणीतरी हे करतंय. अशा पत्रांना मी घाबरत नाही! पण याची आता दखल घेतली पाहिजे. आता ना.म.जोशी पोलीस स्टेशनला कळवलंय. मला जे गार्ड दिले आहेत, ते स्वतः हे पत्र घेऊन गेलेत. आता जरा हे जास्तच व्हायला लागलं. हे सरकार पडून दे, तुला मारु, तू काय मध्ये बोलते, अशा गलिच्छ भाषेत यातून धमकावण्यात आलं आहे.
राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. एकीकडे उद्याच महाविकास आघाडी सरकराला बहुमताची चाचणी द्यावी लागण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे बंडखोर आमदार हे गुवाहाटीत गेलेत. ते देखील उद्या मुंबईमध्ये परतण्याची शक्यता आहे. बहुमताच्या चाचणीसाठी हे आमदार पुन्हा मुंबईत येणार असून त्यांना पोलीस संरक्षणात सभागृहात आणलं जाण्याची शक्यता आहे. तर बहुमत चाचणीविरोधात शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात दाद मागितलीय. संध्याकाळी पाच वाजता याप्रकरणी सुनावणी पार पडणार आहे.
महाराष्ट्र राज्य विधानसभा | सत्तेचं गणित |
---|---|
विधानसभेचे एकूण सदस्य | 288 |
दिवंगत सदस्य | 01 |
कारगृहात सदस्य | 02 |
सध्याची सदस्य संख्या | 285 |
एकनाथ शिंदे गटाकडे किती आमदार | 39 |
आता सभागृहाची सदस्य संख्या | 285 |
बहुमताचा आकडा | 143 |
भाजपचं संख्याबळ | भाजप (106)+शिंदे गट (39)+अपक्ष (27)=172 |
मविआचं संख्याबळ | शिवसेना (16)+ राष्ट्रवादी (51)+ काँग्रेस (44)= 111 |
शिंदे गट भाजपसोबत न गेल्यास भाजपकडे किती संख्याबळ? | भाजप (106)+ अपक्ष (27) = 133 |