कोहिनूर प्रकरणी राज ठाकरेंना ईडीची नोटीस
कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. येत्या गुरुवारी म्हणजे 22 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई : कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी (Kohinoor Square) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना ईडीने नोटीस बजावली आहे. येत्या गुरुवारी म्हणजे 22 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत
कोहिनूर सीटीएनलमध्ये आयएल अॅण्ड एफएस ग्रुपच्या कर्ज आणि 860 कोटींच्या गुंतवणुकीचा ईडी तपास करत आहे. ही कंपनी मुंबईत कोहिनूर स्क्वेअर टॉवर्स उभारत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेश जोशी यांनी ही कंपनी सुरु केली होती. कोहिनूर मिल क्रमांक 3 विकत घेण्यामध्ये राज ठाकरे यांची भूमिका असून यासाठीच ते ईडीच्या रडारवर होते.
लोकसभा निवडणुकीत भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांविरोधात लाव रे तो व्हिडीओची भूमिका घेतली होती. त्यामुळे भाजपच्या चिंतेत भर पडली होती. महाराष्ट्रातील आगामी निवडणुका लक्षात घेता राज ठाकरेंनी ईव्हीएम विरोधातील भूमिका घेतली आहे. याचा फटका शिवसेना-भाजप युतीला बसण्याची शक्यता आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना सरकारविरोधात टीका-टिप्पणी करु नये म्हणून राज ठाकरेंवर दबाव आणण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे बोललं जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
एनमसीटीच्या मालकीची असलेल्या कोहिनूर मिल क्रमांक 3 च्या जागेचा काही वर्षांपूर्वी लिलाव झाला होता. दादरमधील शिवाजी पार्क या ठिकाणी ही जागा असल्याने 421 कोटी रुपयांना तिचा लिलाव झाला. मनोहर जोशींचा मुलगा उन्मेष जोशी यांच्या कंपनीने विकत घेतली. या कंपनीत उन्मेष जोशी यांच्यासह राज ठाकरे आणि राजन शिरोडकर हे तिघे समान भागीदार होते. कोहिनूर मिलची जागा विकत घेताना उन्मेष यांनी आयएल अॅण्ड एफएसला ही सोबत घेतलं होता.
या जागेच्या 421 कोटी या संपूर्ण किमतीपैकी 50 टक्के रक्कम आयएल अॅण्ड एफएस कंपनीने भरले होते. मात्र काही वर्षानी आयएल अॅण्ड एफएसने 50 टक्के हिस्सा 90 कोटी रुपयांना विकला.
दरम्यान कोहिनूर प्रकरणातील एकूण गुंतवणूक 225 कोटींची असूनदेखील कंपनीने आपला 50 टक्के हिस्सा 90 कोटी रुपयांना विकला आणि त्यानंतरदेखील आयएल अॅण्ड एफएस उन्मेष जोशींच्या कंपनीला कर्ज देत होते.
उन्मेष जोशी यांच्या कंपनीला सुमारे 500 कोटी रुपयांचं कर्ज न फेडता आल्याने कंपनीने त्या बदल्यात जागा घेतली. 2011 साली हा व्यवहार झाला, मात्र या व्यवहाराबाबतची नोंदणी 2017 साली करण्यात आली.
तसेच 2008 मध्ये राज ठाकरे व शिरोडकर यांनी 90 कोटीमध्ये आपले शेअर्स विकले होते. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ईडीकडून सुरु आहे.