दोन जिल्हे एक मतदारसंघ, कोकणात मनसेचा गोंधळ
सिंधुदुर्ग : मनसे प्रमुख राज ठाकरे राज्यभर मोदी-शाह यांना मदत होईल, अशा कुणालाही मतदान न करण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, कोकणात त्यांच्या स्वतःच्या पक्षातच गोंधळ उडालेला दिसत आहे. काही मनसे नेत्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गातील स्थानिक पदाधिकाऱ्यांना निलेश राणे यांना सहकार्य करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर रत्नागिरीतील पदाधिकाऱ्यांनी निलेश राणेंना सहकार्य करण्याची तयारीही दाखवली आहे. मात्र, […]
सिंधुदुर्ग : मनसे प्रमुख राज ठाकरे राज्यभर मोदी-शाह यांना मदत होईल, अशा कुणालाही मतदान न करण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, कोकणात त्यांच्या स्वतःच्या पक्षातच गोंधळ उडालेला दिसत आहे. काही मनसे नेत्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गातील स्थानिक पदाधिकाऱ्यांना निलेश राणे यांना सहकार्य करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर रत्नागिरीतील पदाधिकाऱ्यांनी निलेश राणेंना सहकार्य करण्याची तयारीही दाखवली आहे. मात्र, सिंधुदुर्गातील मनसे पदाधिकाऱ्यांनी राणेंना सहकार्य न करण्याची भूमिका घेतली आहे.
मनसेच्या सिंधुदुर्गमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला किंवा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्ता बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शिवसेना किंवा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षापैकी कुणाचाही उमेदवार निवडून आला, तर तो उमेदवार पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींनाच पाठिंबा देणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग मनसे कार्यकारणीने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी-शाह यांना विरोध करण्याचे आदेश दिले होते. त्याचे पालन करत असल्याचा कार्यकारिणीने दावा केला आहे. मात्र, यामागे स्थानिक राजकारणाची किनारही असल्याची चर्चा यानिमित्ताने होत आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात तिरंगी लढत. शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे आणि काँग्रेसचे नविनचंद्र बांदिवडेकर हे तिघे निवडणूक मैदानात आहेत. या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होणार आहे. राज्यात याच दिवशी एकूण 14 जागांसाठी मतदान होणार आहे.