Kolhapur By Election : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसची उमेदवारी जाहीर, चंद्रकांत जाधव यांच्या पत्नीला संधी
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं आपली उमेदवारी जाहीर केलीय. काँग्रेसकडून दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली आहे. तशी माहिती काँग्रेसनं ट्वीटरद्वारे दिलीय.
मुंबई : काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर (Kolhapur North) विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (By Election) काँग्रेसनं आपली उमेदवारी जाहीर केलीय. काँग्रेसकडून दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांना उमेदवारी दिली आहे. तशी माहिती काँग्रेसनं ट्वीटरद्वारे दिलीय. दरम्यान, काँग्रेस ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील आहे. असं असलं तरी भाजप कोल्हापूर उत्तरमधून उमेदवार देणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलीय. दुसरीकडे, आम आदमी पक्षही या निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रात पुन्हा पाऊल टाकण्याच्या तयारी आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ प्रयत्नशील आहेत. तर शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मैत्रीपूर्ण लढतीची मागणी केली होती. मात्र, हा मतदारसंघ काँग्रेसकडे असल्याने महाविकास आघाडीच्या सूत्रानुसार ज्या पक्षाकडे मतदारसंघ आहे त्या पक्षाला आघाडीची उमेदवारी द्यायची असा धोरणात्मक निर्णय करण्यात आलाय. त्यामुळे क्षीरसागर यांची ही मागणी अमान्य झालीय.
The Congress President Smt. Sonia Gandhi, has approved the candidature of Smt. Jayashree Chandrakant Jadav as Congress candidate for the ensuing bye-elections to the Legislative Assembly of Maharashtra from 276- Kolhapur North Constituency. pic.twitter.com/sDxgkqoHRB
— INC Sandesh (@INCSandesh) March 19, 2022
भाजपकडून सत्यजित कदमांना संधी मिळणार?
चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत भाजप ही पोटनिवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय. त्यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, दोनच नावं पाठवायची असतात. दिल्ली त्यावर विचारते तुम्हाला कोणतं नाव हवंय. पण निर्णय दिल्लीचे नेतेच करतात. त्यामुळे निर्णय झाला नाही. निर्णय रात्री होणाऱ्या पार्लमेंट्री बोर्डात होईल. सत्यजित कदम आणि महेश जाधव यांचं नाव पाठवलं आहे. सत्यजीत कदम यांचं नाव फायनल व्हावं असं आमचं म्हणणं आहे. त्यावर आमचं एकमत झालं आहे. पण निर्णय रात्री दिल्लीच्या पार्लमेंटरी बोर्डात त्यावर निर्णय होईल, असं पाटील यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे सत्यजित कदम यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
आम आदमी पक्षही शड्डू ठोकणार
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणूक ‘आप’ संपूर्ण ताकदीने लढणार आहे. ‘आप’कडून विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी दिली. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी चाचपणी सुरु केली आहे. पंजाब मधील यशाने लोकांना नवा पर्याय दिला आहे. त्यामुळे कोल्हापुरातील जनता आपला स्वीकार करेल, असा विश्वास रंगा राचुरे यांनी व्यक्त केला आहे. कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक ही आमच्यासाठी 2024 ची पूर्वतयारी आहे, असा दावाही त्यांनी केला. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक प्रचारासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोल्हापुरात आणण्यासाठी प्रयत्न असल्याचंही रंगा राचुरे यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना सांगितलं.
इतर बातम्या :