“2024 ला नामोनिशान मिटणार, तरिही उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार नाहीत!”, शिंदेगटाच्या नेत्याचा घणाघात
शिंदेगटाच्या नेत्याची उद्धव ठाकरेंवर टीका...
कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि शिंदेगटाचे नेते राजेश क्षीरसागर यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. 2024 च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचं नामोनिशानही राहणार नाही, तरिही उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार नाहीत, असं राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी म्हटलं आहे.
अनेक नेते शिवसेना सोडून जात आहेत. अनेकजण नाराज आहेत. याचं कुणाला काही देणंघेणं नाही. उद्धव ठाकरे यांचा अहंकार आड येतोय. ते अहंकाराने वागत आहेत. आत्मपरिक्षण करीयली ते तयार नाहीत. त्यामुळे लोक पक्ष सोडून जात आहेत, असं राजेश क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी आमच्या गटाच्या नेत्यांवर आरोप करताना विचार केला पाहिजे. 2019 हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मत दिली होती. याचा विसर संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना पडता कामा नये.
2024 बाळासाहेबांची शिवसेना राज्यात मोठ्या प्रमाणावर आमदार घेऊन पुढे येईल. राज्याच्या राजकारणात बाळासाहेबांची शिवसेना आपला वेगळा ठसा उमटवेल, असं म्हणत राजेश क्षीरसागर यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
गेल्या अडीच वर्षात महाविकासाकडे काही केलंच नाही. आता समाजहिताचे निर्णय होत आहेत.चांगलं वातावरण निर्माण होतंय म्हणून विरोधकांना दुसरं काम उरलं नाही. पुढच्या दोन वर्षात देखील राज्याची मोठ्या प्रमाणावर प्रगती होईल. हे विरोधकांना बघवत नाही, असंही क्षीरसागर म्हणालेत.
दिशा सालियान आणि सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याबाबत विचारलं असता राजेश क्षीरसागर यांनी बोलणं टाळलं.