कोल्हापूरः कर्नाटक महाराष्ट्र (Maharashtra Karnataka) सीमाप्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकार अपयशी ठरत आहे. तसेच महाराष्ट्राचे 2 मंत्री कर्नाटक सरकारच्या सुरक्षेसाठीच काम करतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी हस्तक्षेप करून या दोन मंत्र्यांना बेळगावात जाण्यापासून रोखलंय, अशी थेट टीका कोल्हापूरचे ठाकरे गटाचे नेते विजय देवणे (Vijay Devne) यांनी केली आहे.
भाजपचे सरकार असलेल्या कर्नाटक सरकारसाठीच हे मंत्री अशी माघारीची भूमिका घेत असल्याचा आरोप देवणे यांनी केला. कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर समन्वय साधण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई हे शनिवारी बेळगावात जाणार होते. मात्र कायदा व सुव्यवस्थेचे कारण दाखवत कर्नाटक सरकारने या मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये, असे सांगितले.
त्यामुळे महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांचा दौरा त्या दिवशी रद्द झाला. उद्या म्हमजेच मंगळवारी शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील हे मंत्री कर्नाटकात जाण्याची शक्यता आहे. मात्र ठाकरे गटाच्या नेत्यांनी या मंत्र्यांमध्ये तेवढी हिंमत नसल्याचं वक्तव्य केलंय.
कोल्हापूरचे ठाकरे गटाचे नेते विजय देवणे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई मध्ये एवढा दम नाही की ते कर्नाटकचं कडं भेदून बेळगावमध्ये जातील…
सीमा भागातील मराठी माणसांची चाड असेल आणि कर्नाटक सरकारचं कडं भेदून जाणं शक्य नसेल तर गनिमी काव्याने जायला हवं होतं… पण त्यांनी तसं केलं नाही.
महाराष्ट्राचे दोन्ही मंत्री बेळगावमध्ये जाऊ शकत नाहीत. कारण तेवढे त्यांचे धाडस नाही. आम्ही तीन वेळा हे कडं भेदून बेळगावमध्ये गेलोय हे शिवसेनेला जमतं, असा टोमणा विजय देवणे यांनी मारला.
शंभूराजे देसाई हा बनावट मंत्री आहे. तो फक्त मोठ्याने बोलतो. व्हिडिओ कॉन्फरन्स वरच बोलतो, अशी टीका देवणे यांनी केली.
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नावर केंद्रातील भाजप सरकार काहीच भूमिका घेत नाही, यावरून शिवसेनेने नेहमीच टीका केली आहे. विजय देवणे म्हणाले, ‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी यात हस्तक्षेप केला आणि या दोन्ही मंत्र्यांना बेळगाव मध्ये जाण्यापासून थांबवलय. भारतीय जनता पार्टीच्या कर्नाटक सरकारला सुरक्षा देण्याचे काम चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे करत आहेत…
दरम्यान, उद्या महाराष्ट्राचे दोन मंत्री कर्नाटकात जाणार की नाही, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.