Rajan Salvi | राजन साळवी आणि भाजप आमदार रविंद्र चव्हाणांमध्ये बंद खोलीत भेट, पुन्हा चर्चांना उधाण
राजन साळवी हे कोकणताली लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. सध्या ते शिवसेनेचे उपनेतेही आहेत. मागील आठवड्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरु झाली होती.
मुंबईः कोकणातील राजकीय नेत्यांच्या गाठी-भेठींविषयी एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. येथील राजन साळवी हे शिवसेना आमदार शिंदे गटात जाण्याची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. माझी निष्ठा उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पायाशीच आहे, अखेरपर्यंत शिवसेनेतच राहीन असं काही दिवसांपूर्वीच राजन साळवी यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. मात्र पुन्हा एकदा ते एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) गटाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. कारणही तसंच घडलंय. सध्या सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजप आमदार रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) हे कोकण दौऱ्यावर आहेत. राजन साळवी आणि चव्हाण यांची भेट झाल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे दोन नेत्यांमध्ये बंद खोलीत काही चर्चाही झाल्याची माहिती समोर आली आहे. राजन साळवी आणि रविंद्र चव्हाण यांच्यादरम्यान नेमकी काय चर्चा झाली, यातील डिटेल्स अद्याप समोर येऊ शकलेले नाहीत.
कोकण दौऱ्यात नेमकं काय घडलं?
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण सध्या कोकणात आहेत. मुंबई-गोवा हायवेची पाहणी करत ते अधिकाऱ्यांनाही महत्त्वाच्या सूचनाही देत आहेत. मात्र या दौऱ्यात त्यांच्या राजकीय गाठी-भेटीही घडत आहेत. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातले तीन आमदार एकनाथ शिंदे गटात गेले आहेत. पण त्यानंतर ही गळती रोखण्यात शिवसेनेला यश आल्याचं म्हटलं जातंय. त्यातच राजन साळवी यांची त्यांनी भेट घेतली आहे. लांजा येथील शासकीय विश्रामगृहात 20 मिनिटं या दोन्ही नेत्यांदरम्यान चर्चा झाली. त्यामुळे या भेटीत नेमकं काय घडलं, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे.
पुन्हा चर्चांना उधाण
राजन साळवी हे कोकणताली लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. सध्या ते शिवसेनेचे उपनेतेही आहेत. मागील आठवड्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर त्यांनी स्वतः माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण दिलं होतं. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पायाशी माझी निष्ठा आहे, मी त्यांच्याशीच प्रामाणिक आहे आणि अखेरपर्यंत शिवसेनेतच राहणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. शिवसैनिक, नगरसेवक, नगराध्यक्ष तसेच जिल्हाप्रमुख आणि त्यानंतर तीन वेळा आमदार झालो. आता पुढेही मरेपर्यंत उद्धव साहेबांसोबत काम करणार आहे, असं त्यांनी ठणकावून सांगितलं होतं.